केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत शहरातील काही भागांची निवड करून तेथे विविध विकासकामे सुरू करण्याचे नियोजन महापालिकेतर्फे केले जात आहे. नागरिकांना स्मार्ट सेवा-सुविधा पुरवण्याची ही संकल्पना प्रभाग क्रमांक ६७ मध्ये साकारली असून या प्रभागातील ‘मी स्मार्ट’ योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.

प्रभाग ६७ चे नगरसेवक आणि माजी उपमहापौर आबा बागूल यांच्या संकल्पनेतून ‘मी स्मार्ट’ ही योजना त्यांच्या प्रभागात हाती घेण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रभागातील नागरिकांना विविध सेवा मोबाइल अ‍ॅपद्वारे दिल्या जाणार असून इतरही अनेक बाबी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या प्रभागात साकारल्या आहेत. या संपूर्ण योजनेवर ९० लाख रुपये खर्च झाला आहे. योजनेसाठी तयार झालेल्या सर्व पायाभूत सुविधा इतर प्रभागांमध्येही वापरता येणार आहेत, अशी माहिती बागूल यांनी दिली. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रभावी व ऊर्जा बचत करणारे पथदिवे बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ई-रिक्षा आणि अशा इतर अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रभागातील नागरिकांना मोबाइल अ‍ॅप तसेच अन्य मार्गानी नागरी सुविधा कशाप्रकारे देता येतील याबाबत ‘टेकरिनै’ या कंपनीचे प्रमोद गुर्जर यांच्याशी चर्चा करताना अनेक कल्पना पुढे आल्या आणि त्यातून ‘मी स्मार्ट’ ही योजना आकाराला आली, असे सांगून बागूल म्हणाले, की महापालिकेच्या सहकार्याने योजनेच्या पहिल्या टप्प्यात स्मार्ट बस थांबे, स्मार्ट कचरापेटय़ा, सिटिझन पोर्टल, मोबाइल अ‍ॅप, कचरा गोळा करण्यासाठी ई रिक्षा, मोफत वाय-फाय या सेवांचा समावेश करण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर अत्याधुनिक असे चार बस थांबे उभारण्यात आले असून बस थांब्यावरील स्मार्ट डिस्प्लेच्या माध्यमातून पीएमपी गाडय़ांचे मार्ग, संख्या, वेळापत्रक, अपेक्षित कालावधी ही माहिती मिळणार आहे. त्या बरोबरच प्रभागातील अन्य महत्त्वाची माहितीही तेथे मिळेल. सीसी टीव्ही, वाय-फाय या सेवाही बस थांब्यावर उपलब्ध आहेत.

प्रभागातील महत्त्वाच्या रस्त्यांवर स्मार्ट डस्टबीनही बसवण्यात आल्या असून त्यात वर्गीकरण करून कचरा टाकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही कचरापेटी भरल्यानंतर त्याची माहिती संबंधित कर्मचाऱ्याला एसएमएसद्वारे मिळेल. त्यामुळे कचरापेटीतील कचरा वेळीच उचचला जाणार आहे. हा कचरा गोळा करण्यासाठी ई रिक्षांचा वापर केला जाणार आहे.

नागरिकांना सेवा-सुविधांबाबत ज्या तक्रारी करायच्या असतील त्या तक्रारींसाठी सिटिजन पोर्टल तयार करण्यात आल्याची माहिती गुर्जर यांनी दिली. नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून ही यंत्रणा काम करेल. ही सेवा नागरिकांना विनामूल्य उपलब्ध असून प्रभागातील आवश्यक सर्व माहिती या पोर्टलवर पाहता येईल. तक्रारी, प्रतिक्रिया, सूचना अशा स्वरूपाचे हे पोर्टल असून वेगवेगळ्या वेळी नागरिकांना आवश्यक माहितीही या पोर्टलद्वारे कळवली जाणार आहे, असेही गुर्जर यांनी सांगितले. पूर्णत्वास गेलेल्या या योजनेचे उद्घाटन शनिवारी (१६ जुलै) समारंभपूर्वक केले जाणार आहे.