केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी महापालिकेतर्फे ‘माझं स्वप्न, स्मार्ट पुणे’ या विषयावर नागरिकांकडून सूचना व मते मागवण्यात आली असून उत्कृष्ट सूचना आणि मतांना पारितोषिकेही दिली जाणार आहेत. या आगळ्या उपक्रमात आपले पुणे शहर कसे असावे या विषयावर पुणेकर सूचना करू शकतील.
शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे, निवासाच्या चांगल्या सुविधा शहरांमध्ये निर्माण करणे, शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक आणणे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे यासाठी केंद्र सरकारतर्फे देशातील शंभर शहरांची निवड केली जाणार असून या शंभर शहरांमध्ये स्मार्ट सिटी हे अभियान राबवले जाणार आहे. या अभियानात नागरिकांचाही सहभाग असावा, त्यांच्याकडून शहराच्या विकासासंबंधी सूचना याव्यात, मते मांडली जावीत या उद्देशाने चांगल्या सूचनांची स्पर्धा महापालिकेने आयोजित केली आहे.
स्मार्ट सिटीबाबत केवळ प्रशासनाला काय वाटते तेवढाच विचार न करता पुणेकरांना काय वाटते याचाही विचार केला जाणार आहे. त्या दृष्टीने सूचना मागवण्यात आल्या असून नागरिकांनी विकासासंबंधीच्या सूचना प्रशासनाला कराव्यात, असे आवाहन महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी केले आहे. प्रशासन आणि नागरिकांमध्ये संवाद व्हावा आणि नागरिकांचा सहभाग वाढावा या दृष्टीने ऑन लाईन सूचना मागवण्यात आल्या असल्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.
या विषयांवर सूचना पाठवा..
परवडणारी घरे, नागरिकांचा सहभाग, शिक्षण, विद्युत व्यवस्था, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान/ई गव्हर्नन्स, आरोग्य, सौरऊर्जा, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालये, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि पाणीपुरवठा या तेरा विषयांच्या बाबत शहरात कोणत्या सुधारणा होणे आवश्यक आहे याबाबत नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. या विषयांव्यतिरिक्त अन्य विषयांवरही नागरिक सूचना करू शकतात. एका विषयावरील सूचना अडीचशे शब्दांपर्यंत करायची आहे.
सूचना पाठवण्यासाठी..
पुणेकर नागरिकांनी त्यांच्या सूचना २० जुलैपर्यंत पाठवायच्या आहेत. या सूचना ऑनलाईन पद्धतीने पाठवायच्या असून त्यासाठी smartcity.punecorporation.org किंवा punesmartcity.in या संकेतस्थळाचा उपयोग करता येईल.
ज्यांना सूचना लेखी स्वरूपात पाठवायच्या आहेत त्यांनी मा. उपायुक्त (विशेष), महापालिका भवन, दुसरा मजला, शिवाजीनगर, पुणे- ४११ ००५ या पत्त्यावर पाठवायच्या आहेत. लेखी प्रवेशिका पाठवताना नागरिकांनी आपले नाव, मोबाईल क्रमांक द्यावा.
सूचनांना पारितोषिके..
नागरिकांकडून आलेल्या सूचनांचे वास्तविकता, स्पष्टता, कल्पकता आणि परिणामकारकता/उपयुक्तता या चार स्तरावर मूल्यांकन केले जाईल आणि प्रथम तीन सूचनांना अनुक्रमे पंचवीस, पंधरा व दहा हजारांची पारितोषिके दिली जातील.