केवळ संभाषणापुरताच असलेला मोबाइल हळूहळू स्मार्ट झाला आणि या स्मार्टफोनवर आता चक्क मराठीतून शब्दकोडे खेळण्याची संधी मिळाली आहे. मराठी भाषेतील शब्दभांडार विपुल करण्याची सुविधा या निमित्ताने उपलब्ध झाली आहे.
नाशिक येथील झाबुझा लॅब्ज या कंपनीने अँड्रॉइड मोबाइलवर खेळता येईल, असा ३०० लेव्हल्सचा खेळ तयार केला आहे. ज्ञानार्जनाचा आनंद आणि करमणूक म्हणून खेळता येणार आहे. स्मार्टफोन आणि अन्य प्रसार माध्यमांचा भर बहुतांशी इंग्रजीवर असल्याने साहजिकच मराठी भाषेकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचा परिणाम म्हणून मराठी वाचन, लेखन तसेच शब्दकोडी सोडविणे हे दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. मराठीच्या आकलनामध्ये समस्या निर्माण होत असून अभ्यासाअभावी शब्दसंपदा देखील कमी होत आहे. युवा पिढीने पुन्हा नव्या जोमाने मराठीकडे वळावे यासाठी बुद्धीला चालना देणारा आणि शब्दसंपत्ती वाढविणारा शब्दकोडी हा खेळ विकसित केला असल्याची माहिती प्रमोद गाजरे आणि समीर चौधरी यांनी दिली. मराठी शब्दकोडे या अॅपचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांच्या हस्ते झाले.
प्रत्येक शब्दकोडे सात ते आठ शब्दांचे असून प्रत्येक लेव्हल पूर्ण झाल्यावर पाच मुद्रा मिळतात. त्यांचा वापर करून पुढील लेव्हल खेळू शकतो. त्याचबरोबर कोडय़ाचे उत्तर माहीत नसेल, तर काही मुद्रा घेऊन उत्तर माहीत करून घेण्याची सोय आहे. मराठी शब्दकोडे हे पहिलाच मराठी गेम असून आतापर्यंत १२ हजारहून अधिक जणांनी हा गेम डाऊनलोड करून घेतला आहे.
डाऊनलोड कसे करावे..
– गुगल प्ले स्टोअरवर जा.
– मराठी शब्दकोडे असे शोधा.
– डाऊनलोड करा.