४२ किलोमीटर लांबीच्या रस्ते विकसनाला प्रारंभ; ४५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

सेवा वाहिन्या टाकण्यासाठी स्वतंत्र सुविधा, रस्त्यांच्या कडेला पार्किंगची खास व्यवस्था , पावसाळी गटारांसाठी स्वतंत्र यंत्रणा आदी विविध बाबींचा समावेश असलेले स्मार्ट रोड औंध-बाणेर-बालेवाडी भागात बांधण्यात येणार आहेत. या परिसरातील ४२ किलोमीटर लांबीचे स्मार्ट रोड विकसित करण्याच्या प्रक्रियेला स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून प्रारंभ झाला आहे. रस्त्याची आणि पदपथांची गरज ओळखून स्मार्ट रोड अंतर्गत विविध कामे केली जाणार आहेत. त्यासाठी  ४५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून स्मार्ट रोड विकसित करण्यासाठीच्या वेगवेगळ्या टप्प्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून प्रत्यक्ष कामांनाही प्रारंभ झाला आहे. त्याअंतर्गत बालेवाडी भागात १६ किलोमीटर लांबीचे, बाणेर भागात १० किलोमीटर लांबीचे, बाणेर रस्ता (विद्यापीठ ते राधिका हॉटेल) येथील साडेसात किलोमीटर लांबीचे आणि औंध येथील साडेपाच किलोमीटर लांबीचे रस्ते विकसित केले जाणार आहेत. पुढील वर्षभरात रस्ते विकसानाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. औंध-बाणेर-बालेवाडी नंतर संपूर्ण शहरात स्मार्ट रोड ही संकल्पना विकसित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

रस्ते आणि पदपथांच्या पुनर्रचनेची कामे शहरात सुरू आहेत. मात्र ही कामे करताना रस्त्यांची नेमकी गरज काय आहे, याचा विचार करून स्मार्ट रोड ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे. खासगी आणि शासकीय कंपन्यांकडून सेवा वाहिन्या टाकण्यासाठी होत असलेली रस्ते खोदाई, पावसाळी गटारांसाठीच्या स्वतंत्र यंत्रणेची आवश्यकता, प्रस्तावित समान पाणीपुरवठा योजनेसाठी होणारे काम, मेट्रो, बीआरटी या वाहतूक व्यवस्थांचे जाळे या बाबींचा विचार यामध्ये प्राधान्याने करण्यात आला आहे. समान पाणीपुरवठा योजना आणि सेवा वाहिन्या टाकण्यासाठी रस्त्यांची सातत्याने खोदाई होऊ नये, या दृष्टीनेही यामध्ये काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

या रस्त्यांच्या दर २५० मीटर अंतरावर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. इंडियन रोड काँग्रेस आणि स्ट्रीट अर्बन गाइडलान्सच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या रस्त्यांची बांधणी करण्यात येईल. मार्गदर्शक तत्त्वांनुसार रस्त्यांचा विकास करताना २५ वर्षांचा विचार करून वीज, पाणी आणि सांडपाणी वाहिन्यांसाठी उपयुक्त पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार असल्याचा दावा स्मार्ट सिटीकडून करण्यात आला आहे.

या रस्त्यांच्या बाजूला संमिश्र सायकलमार्ग तर ज्या ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी स्वतंत्र सायकल मार्ग पूर्ण क्षमतेने विकसित करण्यात येणार आहेत. स्मार्ट रोड अंतर्गत पदपथांवर कचऱ्याचे डबे, पादचाऱ्यांना बसण्यासाठी आसनव्यवस्था, रस्त्यालगतच्या बसथांब्यांची आकर्षक रचना प्रस्तावित आहे.

१२ हजार वृक्षरोपांची लागवड

स्मार्ट रोड या संकल्पनेअंतर्गत विकसीत करण्यात आलेल्या सर्व रस्त्यांवर मिळून सुमारे १२ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. शहरातील हिरवाई जपण्यासाठी वृक्ष लागवडीचा निर्णय घेण्यात आला असून पदपथ आणि रस्त्यांच्या बाजूला अस्तित्वात असेलल्या झाडांची देखभालही केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे.

रस्त्यांची गरज ओळखून औंध-बाणेर-बालेवाडीमध्ये स्मार्ट रोड या संकल्पनेअंतर्गत कामे सुरू करण्यात आली आहेत. पुढील वर्षी जानेवारी पर्यंत ती पूर्ण होणे अपेक्षित आहे. स्मार्ट रोडमुळे औंध-बाणेर-बालेवाडी भागाच्या विकासात भर पडणार आहे. पादचारी आणि रस्त्याची प्रत्यक्षातील गरज लक्षात घेऊन ही संकल्पना विकसित करण्यात येत आहे.

– डॉ. राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी