पिंपरी-चिंचवडमधील मोशीत २७ व्या आंतरराष्ट्रीय किसान प्रदर्शनाला सुरुवात झाली. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातील कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला हजेरी लावली. सहभागी शेतकऱ्याच्या हातातील स्मार्ट फोन आणि त्यांनी सेल्फीसाठी केलेली धडपड यामुळे प्रदर्शनाला एक वेगळा रंग चढल्याचे पाहायला मिळाले.
काही शेतकरी माहिती घेण्यासाठी मोबाईलचा वापर करत होते. ऑनलाईन बुकिंग करून बळीराजाने प्रगतशील झाल्याचे दाखवून दिले. यंदा दीडशे स्टॉलची अधिक भर पडल्याने, हा आकडा आता सहाशेपेक्षा अधिक झाला आहे.

पाणी व्यवस्थापन, पशुधन, नर्सरी, पॉली हाऊस, अवजारे असे शेती उपयुक्त अनेक गोष्टीचं आधुनिक ज्ञान एका छताखाली मिळावे, या हेतूने हे प्रदर्शन भरवण्यात येते. देशाच्या कानाकोपऱ्यातून बळीराजा आणि विद्यार्थी या प्रदर्शनात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. दोन दिवसात साठ हजार शेतकऱ्यांनी प्रदर्शनास भेट दिली. पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या २६ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय किसान प्रदर्शन भरवले जाते. प्रत्येक वर्षी प्रमाणे यंदा ही या प्रदर्शनाने आपले वेगळेपण राखले. आधुनिक शेती कशी करावी? , आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोग करुन अधिक उत्पन्न कसे मिळवता येईल? या प्रश्नांच्या मार्गदर्शनासाठी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला आहे. १७ डिसेंबरला प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.