सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मोबाईल आणि संगणकासमोर बसून तास न् तास काम करणारी तरुणाई आता खूप मोठय़ा संख्येने हास्यसंघांकडे वळू लागली आहे. राज्यभरातही हास्यचळवळीला मोठा प्रतिसाद असून तब्बल सहा हजार हास्यसंघांच्या माध्यमातून ही चळवळ सर्व शहरांमध्ये पसरली आहे. स्वास्थ्यदायी जीवन जगण्याचा एक उत्तम मार्ग म्हणून आता हास्ययोगाकडे पाहिले जात आहे. हास्यचळवळ आता एकविसाव्या वर्षांकडे वाटचाल करीत असून या निमित्ताने पुण्यात शनिवार व रविवार (१९, २० डिसेंबर) असे दोन दिवस महाराष्ट्र हास्ययोग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
हास्ययोगातील वैज्ञानिक संशोधन, हास्ययोग व प्राणायामाचा परस्पर संबंध, हास्ययोगाची सामाजिक उपयुक्तता अशा विविध विषयांवर वैचारिक, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक बठकीविषयी चर्चा करण्यासोबतच नवनवीन हास्यप्रकारांचे सादरीकरण पाहण्याची संधी या परिषदेच्या माध्यमातून पुणेकरांना मिळणार आहे. पौड रस्त्यावरील एमआयटी कॉलेजच्या विवेकानंद हॉलमध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. ‘लाफ्टर योगा इंटरनॅशनल फाउंडेशन’तर्फे आयोजित या परिषदेचे उद्घाटन शनिवारी सकाळी दहा वाजता हास्यचळवळीचे प्रणेते डॉ. मदन कटारिया यांच्या हस्ते होईल.
निरामय आनंदी आणि आरोग्य संपन्न जीवन जगण्याचा एक सहज सोपा पण अत्यंत प्रभावी असा मार्ग म्हणजे ‘हास्ययोग.’ हास्ययोगाचे धडे देण्याकरिता डॉ. कटारिया यांनी १९९५ मध्ये लाफ्टर क्लबची संकल्पना मांडली. मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स जवळील बागेमध्ये हा पहिला वहिला लाफ्टर क्लब सुरू झाला. अल्पावधीतच ही संकल्पना चळवळीच्या रूपाने जगभर पसरली आणि देशातील बहुतांश शहरांमध्ये सहा हजाराहून अधिक हास्यसंघ निर्माण झाले. पुण्यामध्ये १९९७-९८ च्या सुमारास दोन संघ सुरू झाले. आता हा आकडा दोनशेवर पोहोचला आहे.
परिषदेच्या नियोजन समितीचे प्रमुख डॉ. सुभाष देसाई म्हणाले की, बहुसंख्य हास्यसंघात हास्य प्रकारांबरोबर व्यायाम व प्राणायामही घेतला जातो. हास्ययोग संघ हा नावाप्रमाणेच हास्यप्रधान असायला हवा. त्यासाठी योग्य अशा हास्यप्रकारांना महत्त्व आणि प्राधान्य द्यायला हवे. हास्यप्रकार करताना मनापासून खळखळून हसल्यामुळे शरीरातील ऊर्जाकेंद्र जागृत होतात. त्यातून बाहेर पडणाऱ्या हास्यऊर्जेच्या लहरी शरीरात वर सरकतात. त्यामुळे मेंदूमधील ऊर्जाकेंद्र कार्यान्वित होते. त्यामुळे मनाला आनंद होतो आणि मन प्रसन्न राहते.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अगदी तारुण्यापासून अनेकांना व्याधींशी सामना करावा लागतो. त्यामध्ये उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि मधुमेहासारखे अनेक आजार जडतात. कामामुळे वाढलेला मानसिक ताणतणाव हा यासाठी मुख्यत्वे कारणीभूत आहे. हास्यव्यायामामुळे हा ताण कमी होण्यास मदत होते. रोज सकाळी उठून मोकळ्या हवेत व्यायामासोबत हास्यप्रकार केल्यास निरोगी जीवन जगता येते, हा मूलमंत्र प्रत्येकापर्यंत पोहोचू लागला आहे.
पुण्यातील सार्वजनिक बागा सकाळी हास्यसंघांनी फुलून गेलेल्या दिसतात. हास्ययोगाचा मूलमंत्र युवकांबरोबरच चिमुकल्यांपर्यंत देखील पोचला आहे. त्यामुळे आजी-आजोबांसोबत हास्ययोग करण्याकरिता येणाऱ्या कुटुंबीयांमध्ये तरुणाई आणि चिमुकल्यांचे प्रमाणही वाढले आहे.
– डॉ. सुभाष देसाई