पुणे महानगरपालिका आणि स्फूर्ती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी खासदार वंदना चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘स्माईल’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत ‘स्माईल’ या संस्थेस महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते पन्नास हजारांचा धनादेश प्रदान करण्यात आला. या वेळी महापौर बनकर म्हणाल्या,‘‘ नागरवस्ती विकास योजने अंतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी स्माईल संस्थेने एक उत्तम मॉडेल तयार करून राज्यासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. बचत गटातील महिला आणि अपंग महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करून त्यांच्यासाठी उपजीविकेचे साधन निर्माण केले आहे.’’ सेंट संस्कृतीच्या प्रमुख नंदिनी टांकसाळे म्हणाल्या,की महिलांच्या सक्षमीकरणासाठी आमच्या संस्थेने ‘सेंट संस्कृती’ हा उपक्रम सुरू केला आहे. महिलांना व्यवसायासाठी आर्थिक मदत किंवा कर्ज उपलब्ध करून देण्याचे काम ही संस्था करीत आहे.