‘गोखले इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’ या संस्थेतील पदव्यांच्या वैधतेबाबत साशंकता उपस्थित झाल्यानंतर शनिवारी झालेल्या संस्थेच्या पदवी प्रदान कार्यक्रमाला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उपस्थिती लावणे टाळले. मात्र, या एका प्रसंगामुळे ८५ वर्ष जुन्या संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही, असे संस्थेच्या कुलगुरूंनी कार्यक्रमादरम्यान सांगितले. कुणीतरी स्मृती इराणींचे कान भरल्यामुळेच त्या आजच्या कार्यक्रमाला आल्या नाहीत, असेही त्यांनी म्हटले.
‘गोखले इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’ या संस्थेकडून देण्यात येणाऱ्या काही पदव्या या नियमबाह्य़ असून विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्याच्या उच्च शिक्षण विभागाकडून त्यांच्या वैधतेबाबत चौकशी सुरू आहे. ती चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच पदवी प्रदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होत्या. संस्थेकडून देण्यात येणाऱ्या एम.ए फायनान्शिअल इकॉनॉमिक्स आणि एम.ए अॅग्रीबिझिनेस इकॉनॉमिक्स या पदव्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यताच नाही. इतकेच नाही, तर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनेही या पदव्या मान्य केलेल्या नाहीत. याबाबत आयोगाने जानेवारी अखेरीस आणि राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात चौकशी समिती नेमली आहे.