दहावीच्या परीक्षा सुरू होतायत तोच पुढील वर्षांच्या शिकवण्यांच्या जाहिरातीबाजीचा ससेमिरा पालक आणि विद्यार्थ्यांच्याही मागे सुरू झाला आहे. नर्सरी शाळा, प्रवेश परीक्षांच्या नियमित शिकवण्या, परीक्षांचे उजळणी वर्ग, अकरावीला कोणती शिकवणी लावावी याच्या जाहिरातींचे एसएमएस पालकांच्या मोबाईलवर थडकत आहेत. यामध्ये सीईटीसह इतर प्रवेश परीक्षांच्या शिकवण्या आघाडीवर आहेत.
सध्या दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत, तर बारावीच्या परीक्षा अंतिम टप्प्यांत आल्या आहेत. परीक्षा संपण्यापूर्वीच खासगी शिकवण्यांची जाहिरातबाजी करणारे एसएमएस पालकांच्या मोबाईलवर थडकू लागले आहेत. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षांची ही नवीच डोकेदुखी पालकांच्या मागे लागली आहे. सुटीतील दहावी, बारावीसाठीचे अभ्यासवर्ग, शिकवण्यांच्या जाहिराती, यांबरोबरच अगदी नर्सरी शाळेबाबतचेही एसएमएस पालकांना येत आहेत. नर्सरी शाळांबाबतचे एसएमएसही येत आहेत. विशेष म्हणजे सरसकट सर्व पालकांना हे एसएमएस मिळत नाहीत. ज्यांची मुले दहावी, बारावीच्या वर्गात असतात त्यांनाच हे एसएमएस येतात.
अकरावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तपशिलानुसार त्यांना ‘समुपदेशन’ करण्यासाठी फोनही येऊ लागले आहेत. दहावीच्या गुणांवरून बारावीनंतर कोणत्या अभ्यासक्रमाला विद्यार्थी जाऊ शकेल, त्यासाठी आमचाच क्लास कसा योग्य आहे, कोणत्या परीक्षा मुलाने द्यायला हव्यात, परीक्षांच्या शुल्कासह असणारे क्लासच्या शुल्काचे पॅकेज अशी जाहिरातबाजी फोनवर करण्यात येते. या जाहिरातबाजी करणाऱ्यांकडे विद्यार्थ्यांचे गुण, महाविद्यालय, शाखा असे सगळे तपशील असतात. त्यानुसार वेगवेगळे पर्याय सुचवले जातात. पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही क्लासच्या जाहिरातबाजीचे एसएमएस येत आहेत.
याबाबत पालक वृषाली देशमुख यांनी सांगितले, ‘‘माझा मुलगा अकरावीत आहे. त्याला बारावीला क्लास लावण्याबाबत काही क्लासेसकडून एसएमएसदेखील आले. मुलगा विज्ञान शाखेचे शिक्षण घेतो किंवा त्याबाबतचे सारे तपशील या क्लासचालकांकडे असल्याचे लक्षात आले. मुळात मला बारावीत जाणारा मुलगा आहे हेच कुणा बाहेरील व्यावसायिकाला कसे कळू शकते? असे तपशील दुसऱ्या कुणाला मिळणे धोकादायक वाटते.’’

तपशील मिळाले कुठून?
विद्यार्थ्यांचे तपशील क्लास चालकांना नेमके मिळतात कुठून, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांचे गुण, महाविद्यालय, शाखा असे तपशील हे प्रामुख्याने शिक्षण विभाग, राज्यमंडळ अशाच संस्थांकडे असतात. त्यांच्याकडून क्लास चालकांना तपशील मिळतात का, अशीही शंका व्यक्त करण्यात येत आहे.