वसाहतीतील इमारतींच्या आवारात झुडपे वाढल्याचा परिणाम

शहरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या पोलिसांच्या घरांच्या परिसरामध्ये मात्र एका वेगळ्याच भीतीने धास्ती भरत आहे. स्वारगेट पोलीस वसाहतीतील इमारतीच्या आवारात झुडपे वाढल्यामुळे तेथे सापांचा सुळसुळाट झाला. शहरातील मोठी पोलीस वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वसाहतीत झुडपे वाढल्यामुळे मोठय़ा प्रमाणांवर डासही झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने वसाहतीच्या आवारातील झुडपे कापून तेथे फवारणी करावी, अशी मागणी तेथील रहिवाशांनी केली आहे.

स्वारगेट पोलीस वसाहतीत नऊ इमारती आहेत. या इमारतीत पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय राहत आहेत. वसाहतीत अधिकारी निवासस्थान आहे. वसाहतीचा परिसर विस्तीर्ण असून तेथे मोकळे मैदान आहे. पावसाळ्यात तेथे मोठय़ा प्रमाणावर झुडपे वाढतात. मैदानाच्या आवारात शेजारी असलेल्या स्वारगेट पोलीस ठाण्याकडून जप्त करण्यात आलेली वाहनेदेखील लावण्यात आली आहेत. त्यामुळे तेथे अडगळ झाली आहे. वसाहतीतील इमारतींच्या मागील बाजूस झुडपे वाढली आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून वसाहतीत साप निघत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना केल्या.

वसाहतीतील मैदानावर तसेच आवारात लहान मुले खेळत असतात. आतापर्यंत दुर्घटना घडली नाही. मात्र, प्रशासनाने वेळीच दखल घ्यायला हवी, अशी मागणी तेथील रहिवाशांनी केली.

वादामुळे वसाहतीतील समस्यांकडे दुर्लक्ष

पोलीस वसाहतीतील स्वच्छता आणि डागडुजीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येतात. त्यामुळे वसाहतीच्या आवाराची देखभाल महापालिकेकडून करण्यात येत नाही. महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी हद्दीचा वाद घालतात. त्यामुळे वसाहतीतील समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येते.वसाहतीला लागून दाट वस्ती आहे. तेथे महापालिकेकडून नियमित स्वच्छता आणि धूर फवारणी करण्यात येते. मात्र, वसाहतीतील अंतर्गत भागाकडे दुर्लक्ष करण्यात येते, असा आरोप रहिवाशांनी केला.