मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने दरात वाढ :- यंदाच्या हंगामात महिनाभर आधीच काश्मीरमध्ये हिमवृष्टी सुरू झाल्यामुळे तेथून संपूर्ण देशात होणारी सफरचंदांची आवक जवळपास ठप्प झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने सफरचंदाच्या दरातही वाढ होत आहे.

काश्मीरमधील श्रीनगर, पुलगाम, अनंतनाग, सोपोर, बारामुल्ला या जिल्ह्य़ात सफरचंदाची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. या पाच जिल्ह्य़ांतून संपूर्ण देशात सफरचंद विक्रीसाठी पाठविली जातात. परदेशी सफरचंदांच्या तुलनेत देशी सफरचंदांना मागणी चांगली असते. काश्मीरमधील सफरचंदांचा हंगाम साधारणपणे १५ सप्टेंबरपासून सुरू होतो. पुढे २० ते २५ नोव्हेंबपर्यंत सफरचंदांची तोड करून ती पेटय़ांमध्ये साठविली जातात. टप्प्याटप्प्याने सफरचंदांच्या पेटय़ा विक्रीसाठी पाठविल्या जातात, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील सफरचंदांचे व्यापारी सुयोग झेंडे यांनी सांगितले. काश्मीरमधील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. श्रीनगर ते जम्मू या मार्गावर टप्प्याटप्प्याने वाहने सोडली जात आहेत. जम्मूला जीवनावश्यक वस्तू तसेच अन्य साहित्य श्रीनगरहून पाठविले जाते.

१६ किलोच्या पेटीचा दर एक हजार

काश्मीरमधून होणारी सफरचंदाची आवक ठप्प झाली आहे. सध्या तेथे हिमवृष्टी सुरू आहे. आवक कमी होत असून मागणी चांगली असल्यामुळे घाऊक बाजारात सफरचंदाच्या दरात पेटीमागे २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. सफरचंदाच्या १६ किलोच्या पेटीचे दर १००० ते १२०० रुपये तर १४ किलोच्या पेटीचे दर ८०० ते १००० रुपये आहेत.

काश्मीरमध्ये साधारपणे डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात हिमवृष्टी सुरू होते. नोव्हेंबर महिन्यात तोड करण्यात आलेली सफरचंद पेटीबंद करून साठविण्यात येतात. त्या काळात काश्मीरमधील वातावरण शीतगृहासारखे असते. साठवण्यात आलेली सफरचंद फेब्रुवारीपर्यंत टप्प्याटप्प्याने विक्रीसाठी पाठविण्यात येतात.-  सुयोग झेंडे, व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड