05 July 2020

News Flash

‘काव्यफुले सावित्रीची’ संग्रहातील कवितांची निवड करणारे जाधव सर..

ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांच्याविषयीच्या आठवणींना सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांनी उजाळा दिला.

स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या कवितांचा संग्रह असलेल्या ‘काव्यफुले सावित्रीची’ या खिशात मावेल अशा आकारामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संग्रहातील कवितांची निवड दस्तुरखुद्द रा. ग. जाधवसरांनी केली होती. एवढेच नव्हे, तर या संग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमात अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडाली असताना जाधवसरांमधील सहृदयी माणसाचेही दर्शन घडले होते..
ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांच्याविषयीच्या आठवणींना सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांनी उजाळा दिला. ‘दहा वर्षांपूर्वी २००६ हे सावित्रीबाई फुले यांचे शतकोत्तर अमृतमहोत्सवी जयंती वर्ष होते. सावित्रीबाईंच्या अफाट कर्तृत्वावर पुरेसा प्रकाश पडला नव्हता. त्यामुळे पहिल्या आधुनिक मराठी कवयित्री ही त्यांची ओळख तर अनोळखीच होती. राज्य साहित्य संस्कृती मंडळाने सावित्रीबाईंच्या साहित्यसंग्रहामध्ये त्यांचा ‘काव्यफुले’ हा संग्रह समाविष्ट केला होता. पण, त्या कविता सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशातून पॉकेट बुक आकारामध्ये संग्रह प्रकाशित करावा, असे आम्ही ठरविले. या कविता कोणी निवडाव्यात या प्रश्नाचे उत्तर प्रा. रा. ग. जाधव या नावापाशीच येऊन मिळाले. हा प्रस्ताव मांडताच त्यांनी आनंदाने संमती दिली. जाधव सरांचे बालपण पूर्वीच्या वेताळ पेठ परिसरात गेले असल्यामुळे गप्पांच्या ओघात महात्मा फुले, गुरुवर्य बाबूराव जगताप, देशभक्त केशवराव जेधे, ब्राह्मणेतर चळवळ, सत्यशोधक समाज असे एकामागोमाग एक संदर्भ सांगायला सुरूवात झाली आणि आपण बिनचूक पत्त्यावर येऊन पोहोचलो याची खात्री पटली, अशी आठवण पवार यांनी सांगितली. सावित्रीबाईंच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला ९ मार्च रोजी या संग्रहाचे प्रकाशन महात्मा फुले वाडय़ामध्ये करण्यात आले होते. नंदूरबारच्या आदिवासी कवयित्री झामाबाई वसावे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. अचानक पाऊस सुरू झाला आणि कोठून तरी छत्र्या आणून प्रकाशन उत्साहात करण्यात आले. आपल्याकडे एवढय़ा लांबून पाहुण्या आल्या असताना, नितीन, आपण जरा व्यवस्था करायला हवी होती, असे जाधवसर नंतर मला म्हणाले. तेव्हा सरांमधील सहृदयी माणसाचेही दर्शन मला घडले, अशी आठवण पवार यांनी सांगितली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 1:47 am

Web Title: social activist nitin pawar recalled memories of rg jadhav
Next Stories
1 संवादिनीवादक सीमा शिरोडकर यांना यंदाचा स्वर-लय-रत्न पुरस्कार जाहीर
2 पुण्यातील सीबीएसई शाळांचा निकाल वाढला
3 मराठी विश्वकोशाचा आधार हरपला!
Just Now!
X