निगडीच्या अमरधाम स्मशानभूमीत काही करोनामुळे मृत्यू झालेल्यांवर महानगरपालिकेकडून अत्यंसंस्कार करण्यात आले होते. परंतु, अंत्यसंस्कार झाल्यानंतर अस्थी मात्र तिथेच ठेवण्यात आल्या होत्या. दुसरीकडे करोनाच्या भीतीने नातेवाईकांनी देखील अस्थी घेऊन जाण्यास असमर्थता दर्शवली. मात्र, माणुसकीच्या नात्याने सामाजिक भान राखत पौर्णिमा सोनवणे प्रतिष्ठानकडून करोनामुळे मृत्यू झालेल्या दहा  व्यक्तींच्या अस्थींचे आज विधिवत इंद्रायणी नदीत विसर्जन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या २९ हजारांच्या पुढे गेली आहे. करोनाची भीती नागरिकांच्या मनात अद्यापही कायम असल्याचे दिसत आहे. करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास महानगर पालिकेकडून त्यावर अंत्यसंस्कार केले जातात, त्यानंतर अस्थी विषयी नातेवाईक भीतीपोटी सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळतं आहे. निगडीच्या अमरधाम येथील स्मशानभूमीत करोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर नातेवाईकविना अस्थी स्मशानभूमीत तशाच ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, सामाजिक भावनेतून पौर्णिमा सोनवणे प्रतिष्ठानने विधिवत पूजा करून या अस्थी इंद्रायणी नदीत विसर्जित केल्या.

सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सोनवणे म्हणाले की, करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर अनेक नातेवाईक त्यांच्या अस्थी घेण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे सामाजिक भान ठेवत आम्ही अस्थी विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. विधिवत पूजा करून इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जित केल्या आहेत.

“करोना बाधित व्यक्तींच्या अस्थी घेऊन जाण्यास काही हरकत नाही. त्या आपण विसर्जित करू शकतो” असे मनपाचे आरोग्य अधिकारी पवन साळवी यांनी सांगितले आहे.