करोनापासून बचावासाठी सोशल डिस्टसिंगचं आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतचं केलं होतं. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी लोक याचं पालन करताना दिसत आहेत. दरम्यान, देशात लॉकडाऊन झाल्याने नागरिक घरात बसून कंटाळले आहेत. हा कंटाळा दूर करण्यासाठी काही लोक संध्याकाळी घराच्या छतावर जाऊन निवांत गप्पा-टप्पा करताना दिसत आहेत. मात्र, ते ही सोशल डिस्टंसिंग राखून.

जगात करोनाचा फैलाव वेगानं होत असून अनेक देशांमध्ये हाहाकार माजला आहे. अशातच भारतातही काही वेगळी परिस्थिती नाही. परंतू, सरकारनं वेळीच पावलं उचलल्याने त्याचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, अवघा देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. घराच्या दारात लक्ष्मण रेषा ओढून ठेवा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केलं आहे.

पंतप्रधानांच्या या आवाहनाचं पालन काही नागरिक गांभीर्यानं करताना दिसत आहेत. विविध ठिकाणी भाजीपाला घेण्यासाठी नागरिक एकमेकांमध्ये एक मीटरचं अंतर राखून रांगा करीत आहेत. किराण्याची दुकानं, औषधाची दुकानं अशा सार्वजनिक ठिकाणी ते एकमेकांमध्ये ठराविक अंतर ठेवून रांगा लावत आहेत. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात सध्या ढगाळ वातावरण असल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे संध्याकाळी उन उतरल्यानंतर लोक घराच्या टेरेसवर जाऊन कौटुंबिक गप्पांमध्ये रमलेले पहायला मिळत आहेत.

दिवसभर घरात बसून करणार तरी काय? यावर पर्याय म्हणून घरातील लहान मुलं, तरुण, आई, वडील, आजोबा, आजी हे सर्व एकत्र टेरिसवर जाऊन कौटुंबिक गप्पागोष्टींत रमलेले पहायला मिळत आहेत. मात्र, यात ते सोशल डिस्टन्सिंगचं गांभीर्य बाळगून आहेत. गप्पा मारत असताना दोघांमध्ये काही मीटरचं अंतर ठेवलं जातं आहे. यामुळे सध्याच्या परिस्थितीत करोनाच्या आजारापासून बचावासाठी ते पुरेपूर काळजी घेताना दिसत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आत्तापर्यंत राज्यातील सर्वाधिक १२ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. परंतु, आता इथल्या लोकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वागायचं ठरवल्यानं इथली परिस्थती बदलली आहे.