दसरा संपता-संपता चाहूल लागते ती दिवाळीची. दिव्यांच्या या सणाच्या स्वागताची उत्सुकता अनेकांना असते आणि याचवेळी अनेक हात दीपावलीच्या स्वागतासाठी लागणारे साहित्य तयार करण्यात गुंतलेले असतात. आकाशकंदील, पणत्या, पाण्यावर तरंगणाऱ्या मेणबत्त्या, उटणी, शुभेच्छापत्रांच्या निर्मितीमध्ये व्यावसायिक मंडळी व्यस्त असतात आणि याचवेळी विविध सामाजिक संस्थांमध्येही अशा वस्तू तयार करण्याची लगबग सुरू झालेली असते. शारीरिक आणि मानसिक अपंगत्व असणाऱ्यांना या निमित्ताने उत्पन्नाचे एक साधन मिळते आणि त्यांची दिवाळी देखील आनंददायी होण्यास मदत होते. अशा अनेक हातांपैकीच एक आहेत ते बालकल्याण शिक्षण संस्थेमधील विद्यार्थी. तेही आता जोमाने कामाला लागले असून या कामात त्यांचे शिक्षकही त्यांना उत्स्फूर्तपणे मदत करीत आहेत.
‘बालकल्याण’मधील भाग्यश्री नडीयेटला या शिक्षिकेने काढलेल्या चित्रांच्या साहाय्याने यंदाची दिवाळी शुभेच्छापत्र सजत असून त्यांची निर्मितिप्रक्रिया सध्या संस्थेत सुरू आहे. त्या स्वत:ही कर्णबधिर आहेत. दरवर्षी शुभेच्छापत्र तयार करताना विद्यार्थ्यांची मदत घेतली जाते. विद्यार्थ्यांकडून चित्रे काढून घेतली जातात; पण यंदा प्रथमच शिक्षिकेने चितारलेल्या रंगरेषांचा उपयोग या शुभेच्छापत्रांसाठी करण्यात आला आहे. भाग्यश्री यांनी कलाविषयक प्रशिक्षण (जीडी आर्ट) घेतले असून त्यांच्या चित्रांच्या माध्यमातून शुभेच्छापत्र बनविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
दिवाळीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध वस्तूंची विक्री करीत असताना विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी करण्याचा सामाजिक संस्थांचा उद्देश असतो. यंदाच्या वर्षी शिक्षिकेला प्रोत्साहित करण्याबरोबरच आर्थिक स्वावलंबित्व देण्याचा हा प्रयत्न आहे. दिवाळी शुभेच्छापत्र ग्राहकांना आवडतील, आकर्षित करतील अशी निर्मिती होणे आवश्यक असते. अशीच निर्मिती आता बालकल्याण आणि अन्यही सामाजिक संस्थांमध्ये सुरू झाली आहे. बालकल्याण संस्थेमध्येच २५ ते २७ ऑक्टोबर दरम्यान भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनात ही शुभेच्छापत्रं विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.