समाजमाध्यमावर झालेल्या ओळखीनंतर एका महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिच्याकडून ८ लाख ६६ हजार रुपये उकळणाऱ्या एकाला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली.

नितीन सुरेंद्र भंडारी (वय ३६,रा. कोरेगाव पार्क) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा स्वतंत्र व्यवसायआहे.

तिचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यानंतर समाजमाध्यमावर तिची आरोपी भंडारी याच्याबरोबर ओळख झाली. भंडारी अणि महिला एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्या गाठीभेटी झाल्या. त्यावेळी भंडारीने महिलेला व्यावसायिक असल्याची बतावणी केली. गेल्या चार वर्षांपासून तो महिलेच्या संपर्कात होता. त्यानंतर व्यवसायात तोटा झाल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जात असल्याची बतावणी भंडारीने तिच्याकडे केली.

महिलेकडून त्याने वेळोवेळी पैसे घेतले. तिच्या बँक खात्यातून भंडारीने ८ लाख ६६ हजार रुपये स्वत:च्या खात्यावर वळवले. पैसे घेतल्यानंतर भंडारीने पुन्हा तिच्याकडे पैशांची मागणी केली.

दरम्यान, महिलेला संशय आल्याने तिने चौकशी सुरू केली. तेव्हा भंडारी निरुद्योगी असल्याचे निदर्शनास आले. महिलेला भेटायला येताना त्याने भाडेतत्त्वावर महागडय़ा मोटारी आणून तिच्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. भंडारीने फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलेने विचारणा केली.

त्यावेळी भंडारीने महिलेला मारहाण करून धमकावले. त्याच्या धमक्यांमुळे त्रासलेल्या महिलेने अखेर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर भंडारीला अटक करण्यात आली, अशी माहिती गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक निखील पवार यांनी दिली.