लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारा सोशल मीडिया.. आणि त्या पाश्र्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत वाढलेला सोशल मीडियाचा वापर यामुळे यंदा निवडणुकीचा फड चांगलाच रंगला जाणार यात शंका नाही. राज्यात सोशल मीडियाच्या ‘हाय टेक’ प्रचाराला सर्वच पक्षांनी कंबर कसली असून त्याची सुरुवातही झाली आहे. सोशल मीडियावर नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, भाषाणांचा व्हिडियो, छायाचित्र, कामांची माहिती तर दिली जात आहेच. मात्र, त्याचबरोबर कार्यकर्ते आता आपआपल्या नेत्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला विविध टोमणेबाजी, वेडीवाकडी छायाचित्र आणि शेरोशायरीने टोमणे मारून धुमाकूळ घालताना दिसत आहेत. फेसबुक, वॉट्सअप, यू-टय़ुबवर याला चांगलेच उधाण आले असून हे सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेत्यांच्या पुढे कार्यकर्तेच आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.
 सोशल मीडियाने लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे राज्यात काही दिवसांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांतील नेत्यांनी सोशल मीडियावरील प्रचाराला प्राधान्य दिले आहे. पक्षाच्या पेजबरोबरच स्वत:चे पेज, केलेल्या कामांची माहिती, करण्यात येणाऱ्या कामांची माहिती आणि मतदारांना आकर्षण्यासाठी आश्वासने दिली जातात. मात्र, त्याही पुढे कार्यकर्ते प्रचारापेक्षा प्रतिस्पर्धी उमेदवारांची सोशल मीडियावर टोमणे मारून खिल्ली उडवण्यात दिसून येत आहेत. शेरेबाजी, विविध स्वरूपातील छायाचित्राने अक्षरश: सोशल मीडियावर ‘कार्यकर्त्यांनी रान पेटवले आहे. ‘त्या भंगार चोराला मतदान करू नका, —चे भंगार विकून खाल्लंय त्याने, तुम्हाला पण विकून खाईल’.. ‘आपला नेता भारी, आपली मुलं भारी, आपला हात भारी.. आपला पक्षच लय भारी’.. ‘भगवान का शुकर है की, काँग्रेस की नजर वॉट्सअप पर नही पडी, वरना इसका भी नाम बदल कर .. रखते, ‘इलाका किसी का भी हो.. पर धमाका हमारा ही होगा’..‘हिट झाला टाइमपास खूप गाजली दुनियादारी, आता आपली बारी विरोधक पण म्हणतात आमदार म्हणून… लय भारी’ अशा स्वरूपातील शायरीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
नवीन येणाऱ्या चित्रपटामधील डायलॉग, त्यातील छायाचित्र तत्काळ रोज नव्या स्वरूपात आपआपल्या नेत्यांच्या छायाचित्रासह प्रचारासाठी वापरण्यात येत आहेत. तसेच त्यातील काही निवडक आणि गाजलेल्या डायलॉगचा वापर करून विविध वेडीवाकडी शायरी तयार करण्यात येत आहे. आपआपल्या नेत्यांच्या प्रचारासाठी आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराची ‘जिरवण्यासाठी’ या शायरीचा वापर करून खिल्ली उडवली जात आहे. येणाऱ्या दिवसांत सोशल मीडियाचा प्रचार कोणत्या थरला जाणार आणि त्यातून नेमके काय साधले जाणार हे पाहावे लागणार आहे. यामुळे सोशल मीडियावरील प्रचाराचा स्तर घसरला जातोय का? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.