गोसावी वस्ती परिसरात राहणाऱ्या इंदिराने आपल्या घराच्या परिसरातील व्यक्तींसाठी विविध दात्यांकडून कपडे गोळा करण्यास सुरुवात केली. या कामासाठी बसने लांब-लांब प्रवास करीत नवनवीन लोकांना भेटून त्यांच्याकडून कपडे, धान्य ती आणायची आणि वस्तीतील आर्थिक निम्नस्तरातील व्यक्तींना वाटून टाकायची.

वजन कमी करण्यासाठी शरीराला कष्ट देऊन स्वत:ची उपासमार करून घेणाऱ्यांचा एक वर्ग आहे. कमनीय बांधा केवळ उपासमार करून घेतल्यानेच लाभतो अशी गैरसमजूत असल्यामुळे अनेक जण देह कष्टवितात. पण पोटाला भाकरी न मिळाल्याने होणारी उपासमार भूक या शब्दाचे गांभीर्य सांगून जाते. अनेक कारणांमुळे अनेक जणांना या भुकेशी सामना करावा लागतो. कधी खिशात पैसा असूनही उपासमारीची वेळ अनुभवावी लागू शकते. समोर अन्नपदार्थ दिसताहेत, पण खिशात पैसा नसल्यामुळे ते विकत घेऊन पोटातील अग्नीला शांत करता येत नाही, ही हतबलता जास्त क्लेशदायक असते. ‘खायला कोंडा आणि उशाला धोंडा’ ही म्हण सांस्कृतिक ठेवा म्हणून उच्चारायला सोपी आहे, पण त्यासाठी भुकेला किमान कोंडा तरी मिळायला हवा. पोट भरले असेल तर मग झोपेसाठी धोंडा नक्कीच उपयोगी पडू शकतो. पण.. पोट भरलेले असणे हे अधिक महत्त्वाचे. भूक लागणे, त्या वेळी खायला काही न मिळणे आणि वारंवार उपासमारीला सामोरे जावे लागणे, ही जाणीव एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांला जन्माला घालू शकते. भूक आणि गरिबीच्या वेदनाच जेव्हा प्रेरणा होऊन स्फुलिंग चेतवतात, तेव्हाच घडू शकते इंदिरा लक्ष्मण भिलारे सारखी नि:स्पृह कार्यकर्ती. आपण करतोय हे सामाजिक कार्य आहे, या विचारांचा कोठेही लवलेश नसतानाही अनेक दु:खीजनांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारी आणि त्यांच्या पोटातील अग्नीला शांत करण्यासाठी धडपडणारी इंदिरा.

बेदरकार, उच्छाद मांडणारी तरुणाई असा वारंवार शिक्का मारल्या जाणाऱ्या तरुणाईला केवळ आदर्शच नाही, तर तरुणाईतील चांगुलपणाचे प्रतिनिधित्व करणारी इंदिरा केवळ मनुष्यप्राण्यांसाठीच नाही तर पशुपक्षी आणि सापासारख्या प्राण्यांसाठी जीवनदायिनी ठरली आहे. सात बहिणी आणि दोन भावांच्या पाठीवर जन्माला आलेल्या इंदिराला पोटाला मिळणेच दुरापास्त, तेथे शिक्षणाचा तर दुरान्वयानेही संबंध नाही. अशा परिस्थितीत लहानाची मोठी होत असताना आईवडिलांकडून सामाजिक जाणिवेचे उपजत धडे तिला मिळत होते. तिची शिक्षणाची भूक भागविण्यासाठी मदतीचा हात मिळाला तो सुशीला आणि सुधीर द्रविड यांचा. या दाम्पत्यामुळे अक्षरओळख आणि काहीसे इंग्रजीचे ज्ञान देखील मिळाले. या ज्ञानाच्या जोरावर सेवासदन शाळेत इंदिराने वयाच्या विसाव्या वर्षी पहिलीला प्रवेश घेतला. तिची बुद्धिमत्तेची चुणूक आणि हुशारी तेथील उषा हंचाटे बाईंनी हेरली आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे तिला पाचवीला प्रवेश मिळाला आणि चार वर्षांमध्ये तिने दहावीपर्यंत शिक्षणही पूर्ण केले.

कर्वेनगर परिसरातील शेतीवर गुजराण करणारे आईवडील दोघांकडून सामाजिक भान मिळविणाऱ्या इंदिराने गरिबी आणि भूक अनुभवली होती. हीच जाणीव आज तिच्या सामाजिक कार्याकडे घेऊन आली आहे. आपली परिस्थिती नसतानाही तिचे आईवडील इतरांना मदत करायचे. कोणी आजारी असेल, तर वडील त्यांना औषधासाठी मदत करायचे, दवाखान्यात घेऊन जायचे. खुरपायला येणाऱ्या बायकांना जे काही आपल्याकडे आहे, त्यातूनच आई (कल्याणी) खायला द्यायची.

गोसावी वस्ती परिसरात राहणाऱ्या इंदिराने आपल्या घराच्या परिसरातील व्यक्तींसाठी विविध दात्यांकडून कपडे गोळा करण्यास सुरुवात केली. या कामासाठी बसने लांब-लांब प्रवास करीत नवनवीन लोकांना भेटून त्यांच्याकडून कपडे, धान्य ती आणायची आणि वस्तीतील आर्थिक निम्नस्तरातील व्यक्तींना वाटून टाकायची. आपण अनुभवलेली गरिबी आणि भूक दुसऱ्या मुलांना अनुभवावी लागू नये, म्हणून त्या मुलांसाठी झटण्याचे इंदिराने ठरवले आणि त्यातून तिच्या सामाजिक कार्याला बळकटी येऊ लागली.

‘कमवा आणि शिका’ या स्वत:च स्वत:साठी तयार केलेल्या योजनेतून आपल्या शेतातील आंबे, जांभळे विकण्याबरोबरच नारळ काढून देणे, मधमाश्यांना त्रास होऊ न देता मध काढून देणे असे उपक्रम सुरू केले. यातून मिळणाऱ्या उत्पनातून पै-पै साठवत तिने बुलेट घेतली. याशिवाय ती ग्लास पेंटिंग करते, मेंदी, रांगोळीच्या ऑडर्स देखील घेते. तसेच महिलांचे व्यायाम घ्यायला, योगासने शिकवायला देखील जाते. आपल्या कार्यासाठी, धावधाव करण्यासाठी सुयोग्य वाहन पाहिजे ही साधीसोपी वाहन घेण्यामागची भावना. माणसांप्रमाणेच पक्षी-प्राण्यांवर प्रेम करणारी इंदिरा साप देखील लीलया पकडते आणि त्याला सुयोग्य जागी नेऊन देखील सोडते. हे प्रशिक्षणासाठी तिने पुस्तकांनाच आपले गुरू केले. विषारी-बिनविषारी साप, त्यांच्या जाती यांचा अभ्यास करण्यातून तिने अनेकानेक साप संपूर्ण पुणे शहरातील विविध घरे, आश्रम यातून पकडले. या मोहिमेद्वारे तिने माणसांवरचे संकट दूर केले नाही, तर त्या सापांना मृत्यूपासून रोखले. सापांच्या जातींविषयी योग्य अभ्यास नसल्यामुळे आणि घबराटीतून अनेकदा या सापांना मारून टाकले जाते. ही माणसांमधील भीती दूर व्हावी म्हणून इंदिराने सर्पविषयक व्याख्याने देण्यास सुरुवात केली. या तिच्या बोलण्याला व्याख्यान असे म्हणतात, असे तिला हळूहळू अनुभवातून कळू लागली, इतकी तिची निरागसता. हीच निरागसता तिला मुलांमध्ये आणि प्राण्यांमध्ये काम करताना उपयोग पडते. सापांशिवाय पोपट, घार, गिधाड कुठे अडकले असेल तर ती त्यांना देखील जीवदान देते. याशिवाय सोडून दिलेली कुत्री-मांजरी यांचा देखील ती सांभाळ करते. या सगळ्यात छत्रपती पुरस्कारविजेता तिचा भाऊ लाला आणि वहिनी मंगल हे दोघेही मदत करतात. प्राण्यांना मलमपट्टी करणे, त्यांना खायला घालणे, यासाठी वहिनीची तिला मदत होते. याशिवाय तिच्या कार्यात अनघा ठोंबरे यांची मदत होते तसेच रूपेश मुटकले यांचाही इंदिराच्या सामाजिक कार्यात वाटा आहे. तिच्या सामाजिक कार्यात तुम्हालाही सहभागी व्हायचे असेल, तर ७७७६०३०७८६ या क्रमांकावर इंदिराशी संपर्क साधता येईल.

नुकतीच तिने ‘कल्याणछाया’ या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून जखमी प्राणी-पक्ष्यांसाठी निवारा, वृद्ध तसेच मुलांसाठी आश्रम स्थापन करण्याचा तिचा मानस आहे. या संस्थेच्या माध्यमातून तिने नुकतेच कष्टकरी महिलांचे आरोग्य शिबिर घेतले. जे पैसे मिळतात, त्यातील अर्धे पैसे सामाजिक कार्यासाठी वापरते. संस्था नोंदणी करताना देखील इंदिराला खूप अडचणी आल्या, आर्थिक फसवणुकीला देखील तिला सामोरे जावे लागले. पण पुढे ओळखीच्या लोकांकडून मार्गदर्शन आणि मदत मिळाल्यामुळे तिने ही संस्था सुरू केली.

परिस्थितीमुळे सुरुवातीला शिकता नाही आले नसले, तरी जर जिद्द आणि प्रयत्न असतील, तर आयुष्यात प्रत्येकालाच स्वत:साठी आणि पर्यायाने समाजासाठी देखील काही करता येऊ शकते, ही इंदिराची भावना आहे. तिने बी.ए.च्या पहिल्या वर्षांला प्रवेश देखील घेतला, पण आपल्या कामांमध्ये परीक्षा कधी झाली, हेच तिला समजले नाही. असे असले तरी ती बी.ए. प्रथम वर्षांला पुन्हा प्रवेश घेणार असून पुढे खूप शिकण्याची तिची इच्छा आहे.  त्वायक्वांदोची खेळाडू असलेली इंदिरा मुलींना स्वसंरक्षणासाठी त्वायक्वांदो देखील शिकवते. याशिवाय सुटीच्या दिवशी आणि आपल्या कामातून आवर्जून वेळ काढून ती विविध आश्रमांमध्ये मुलामुलींशी खेळण्यासाठी आजी-आजोबांना भेटण्यासाठी जाते. जे पुरुषाला येते, ते स्त्रीला आलेच पाहिजे याच भावनेबरोबर झोकून देण्याची वृत्ती आणि दिलेला शब्द पाळण्याचे महत्त्वाचे कसब अंगी बाणलेली इंदिरा आजच्या तरुणासाठी दिशादर्शक वाटचाल करत आहे.