स्वतंत्र विचारांचा प्रभाव वाढल्यामुळे विवाहित मुलांमध्ये शिरलेले ‘प्रायव्हसी’चे खूळ, जागा अपुरी पडू लागल्याने वाढत चाललेली विभक्त कुटुंबपद्धती, जीवनाचा जोडीदारही अचानक जगातून निघून गेला किंवा घटस्फोट झाल्यामुळे वेगळा झाला तर, माणसाच्या आयुष्यात एकाकीपण येते. जीवनातील या रितेपणातून संबंधित व्यक्तीला पूर्ततेकडे नेण्यासाठी ‘आनंदयात्रा’ हा स्वमदत गट गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत आहे. एकमेकांना आधार देत आणि मदतीला धावून जात या गटातील सदस्य दुसऱ्याला आनंद देत एकाकी जीवनाला शह देण्यात आपला आनंद मानत आहेत.

आनंदयात्रा हा स्वमदत गट ४५ वर्षांपुढील विधवा, विधूर, विभक्त आणि अविवाहित अशा एकाकी व्यक्तींना भावनिक आधार देण्यासाठी नेस वाडिया महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. हेमंत देवस्थळी यांनी १६ मार्च २००८ रोजी स्थापन केला. या गटाच्या कार्याला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त पेरुगेट येथील भावे प्रशालेच्या सभागृहामध्ये रविवारी (२५ मार्च) सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या गटाच्या दशकपूर्ती कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ एकटेपणाच्या प्रश्नावर आपले विचार मांडणार आहेत, अशी माहिती गटाचे अध्यक्ष डॉ. हेमंत देवस्थळी आणि मनोहर बोरगावकर यांनी दिली.

आनंदयात्रा हे पुनर्विवाह मंडळ नसून अभिनव संकल्पनेवर आधारलेला स्वमदत गट आहे. कोणत्याही कारणाने आलेल्या एकटेपणाला स्त्री-पुरुष असा भेद नसतो. गरीब-श्रीमंत अशा दोन्ही वर्गातही एकटेपणा दिसून येतो. त्यातही जीवनाचा जोडीदार अचानक जगातून निघून गेला किंवा विभक्त झाला तर अध्र्या प्रपंचात येणारे एकटेपण असह्य़ होत असते. नैराश्याची भावना दाटते आणि जगण्यातला अर्थ संपला असे वाटायला लागते. हा एकटेपणा आणि मानसिकदृष्टय़ा येणारे रितेपणे नाहीसे करण्यासाठी आनंदयात्रा स्वमदत गट कार्यरत आहे. आनंदयात्रा स्वमदत गटाच्या दर रविवारी होणाऱ्या सभेत विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने आणि चर्चा आयोजित केली जाते. नाटक, साहित्य, पर्यावरण, चित्रपट, इतिहास, सामाजिक कार्य, सार्वजनिक स्वच्छता, भूगोल, पर्यटन, गुंतवणूक, उद्योजकता अशा विविध विषयांवर जाणकार व्यक्तींना आमंत्रित करून स्वमदत गटाच्या सदस्यांना अद्ययावत केले जाते. त्यामुळे सदस्यांच्या विचारांना चालना मिळते आणि रितेपणाकडून पूर्ततेकडे जाण्याचा त्यांचा प्रवास सुरू राहतो. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, अभिनेते विक्रम गोखले, डॉ. मोहन आगाशे, गिरीश ओक, दिलीप प्रभावळकर, साहित्यिक डॉ. अनिल अवचट, डॉ. सदानंद मोरे, व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, उद्योजिका अनु आगा, डॉ. ह. वि. सरदेसाई, वात्रटिकाकार रामदास फुटाणे अशा मान्यवरांनी आनंदयात्रींचे जीवन समृद्ध केले आहे.

‘जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाय्या, जे शक्य साध्य आहे ते निर्धार दे कराया’ या प्रार्थनेने दर रविवारी आनंदयात्रा स्वमदत गटाच्या सभेची सुरुवात होते. सभेमध्ये दर दोन महिन्यांनी त्या कालखंडातील सदस्यांचे वाढदिवस साजरे केले जातात. त्या स्त्री-पुरुष सभासदास व्यासपीठावर बोलावून त्यांची ओळख आणि पूर्वायुष्यातील चांगल्या गोष्टींचा उल्लेख केला जातो. त्यामुळे संबंधित उत्सवमूर्तीलाही आनंद होतो. साप्ताहिक सभेबरोबरच तळजाई, पर्वती, वेताळ टेकडी अशा विविध भागांत सकाळी किंवा संध्याकाळी सामुदायिक वनविहार करून गप्पांतून मन हलके केले जाते. पुण्याजवळील प्रेक्षणीय ठिकाणांना भेट देण्यासाठी एक-दोन दिवसांची सहल आणि सामुदायिक भोजनाचा आनंद लुटला जातो. अनेक सदस्य आपल्या आवडीनुसार एकत्र येऊन नाटक-चित्रपट पाहतात. गाण्याच्या मैफलीला एकत्र जातात. अशा विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे आनंदयात्रेचे सदस्य रविवारची आतुरतेने वाट पाहात असतात.