आदिवासी बांधवांना स्वयंपूर्ण करण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मेळघाटात संपूर्ण बांबू केंद्र ही संस्था काम करत आहे. या संस्थेचे कार्य पाहून या कामाला साहाय्य करण्याच्या उद्देशाने पुण्यातील पाच मित्रांनी एकत्र येऊन ‘मेळघाट सपोर्ट ग्रुप’ची स्थापना  केली आणि गेल्या दोन वर्षांपासून जुने कपडे संकलन, बांबूच्या वस्तूंची विक्री, संस्थेसाठी आर्थिक मदतीचे संकलन या माध्यमातून मेळघाटातील आदिवासी बांधवांना पुण्यातून भरघोस मदत दिली जात आहे. यंदाही मेळघाट सपोर्ट ग्रुपने केलेल्या आवाहनाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.

‘मेळघाट सपोर्ट ग्रुप’च्या माध्यमातून वापरण्यायोग्य जुने कपडे देण्याचे आवाहन नागरिकांना व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक यांच्या माध्यमातून  करण्यात येते. संपूर्ण बांबू केंद्राची स्थापना सुनील देशपांडे आणि निरूपमा देशपांडे यांनी २३ वर्षांपूर्वी केली. या कार्याला पुण्यातील मेळघाट सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून शक्य ते साहाय्य केले जाते. मेळघाट सपोर्ट ग्रुपचे विलास फाटक म्हणाले,‘ या वर्षी  २५ मे ते २७ मे या कालावधीत कपडे व अन्य वस्तूंच्या संकलनाचा उपक्रम राबविण्यात आला. यंदाही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवसात सातशे पुणेकरांनी भेट दिली. उपक्रमात तब्बल ८५० मोठी पोती जुने कपडे देण्यात आले. याशिवाय ११ सायकल, २० शाळेचे गणवेश, ३ टेपरेकॉर्डर, मोठय़ा सतरंज्या, ताटे, वाटय़ा, पातेली, भांडी या वस्तूदेखील देण्यात आल्या. त्याचबरोबर जुन्या पद्धतीचा टाईपरायटर  आणि अनेक गृहोपयोगी वस्तू देण्यात आल्या. जमा झालेले कपडे मेळघाटात पाठविल्यानंतर वापरण्यायोग्य कपडे, पिशव्या, रजया तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कपडे अशा प्रकारात ते वेगळे केले जातात. त्यानंतर वापरण्यायोग्य कपडे गरजूंना देण्यात येतात. उरलेल्या कपडय़ांच्या माध्यमातून बटवे, पिशव्या, रजया तयार केल्या जातात. ते तयार करण्याचे प्रशिक्षण तेथील महिलांना देण्यात आले असून या कामासाठी लागणारी शिवण यंत्रंही महिलांना केंद्राकडून देण्यात आली आहेत. त्यांनी बनविलेल्या विविध वस्तू, पिशव्या, रजया यांचे प्रदर्शन भरवले जाते व त्यांची विक्री केली जाते. या माध्यमातून अनेक महिला आर्थिकदृष्टय़ा सक्षम झाल्या असून त्यांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. या वर्षीचे संकलित झालेले कपडे वणव्यामध्ये बेघर झालेल्या सीमाडोह, मेळघाट येथील बांधवांना देण्यात येणार आहेत.’

मेळघाट सपोर्ट ग्रुपचे मिलिंद लिमये म्हणाले, की उपक्रमाअंतर्गत ८९ शिवणयंत्रं महिलांना देण्यात आली असून त्यामुळे महिला स्वयंपूर्ण झाल्या आहेत. सपोर्ट ग्रुपतर्फे  या व्यतिरिक्त विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यात बांबूपासून राख्या तयार करण्यासारख्या उपक्रमाचा समावेश आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बांबूपासून राखी तयार करण्यासाठी आवश्यक वस्तूंचा एक संच दिला जातो. शालेय विद्यार्थी देखील आवडीने हा संच विकत घेतात आणि त्यापासून राखी बनवितात. अनेक शाळांमधून राखी संचाला मागणी आहे. बांबूचे स्वच्छतागृहही बनविण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड मधील अ‍ॅटलास कंपनीने सामाजिक उत्तरदायित्वाअंतर्गत बांबूची शंभर स्वच्छतागृहे बांधून दिली आहेत.

आगामी उपक्रमांची माहिती देताना विलास फाटक म्हणाले,की मेळघाटचा विपुल निसर्गसंपदा असणारा डोंगराळ प्रदेश, तेथील जीवन याचा अनुभव घेण्यासाठी मेळघाट पर्यटन सहलीचे नियोजन करण्याचा मानस आहे. ही पर्यटन सहल वर्षांतून दोनदा जून व डिसेंबर या महिन्यात काढण्यात येणार आहे.