25 November 2020

News Flash

लोकशाही आणि माणुसकीची फारकत होता कामा नये

डॉ. बाबा आढाव यांची अपेक्षा

डॉ. बाबा आढाव यांची अपेक्षा

पुणे : करोनामुळे आलेल्या संकटामुळे मजुरांचे लोंढे परत चाललेले  पाहिले की, मनुष्यत्वाची किंमत नसेल तर लोकशाहीचा आत्मगौरव कसा करायचा, असा प्रश्न उभा ठाकतो. त्यामुळे लोकशाही आणि माणुसकीची फारकत होऊ नये, यासाठीच आता प्रयत्न करायला हवेत, असे मत ज्येष्ठ सामाजिक  कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.

काम असेल तरच दाम अशा व्यवस्थेत आपण कोणाचे शोषण करतो? याचा विचार करण्यास कु णी तयार नाही. अशा मजुरांना कोणत्याच कायद्याचे संरक्षण नाही, त्यांच्यासाठी कामगार कायदेही तयार होऊ शकले नाहीत, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त

केली. ‘एक गाव एक पाणवठा’ चळवळीचे शिल्पकार, ‘कष्टाची भाकर’ संकल्पनेचे प्रणेते, हमाल पंचायतसह रिक्षाचालक, मोलकरीण, कागद-काच-पत्रावेचक कर्मचारी, बांधकाम कामगार अशा असंघटित कष्टकऱ्यांना संघटित करणारे कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव सोमवारी (१ जून) वयाची ९० वर्षे पूर्ण करीत आहेत. हे औचित्य साधून ‘लोकसत्ता’च्या संपादकीय विभागातील सहकाऱ्यांनी डॉ. आढाव यांच्याशी दूरचित्र संवाद साधला.

केवळ ‘आत्मनिर्भरता’ शब्द काय कामाचा? करोनावर औषध शोधण्यासाठी सामुदायिक पुरुषार्थ महत्त्वाचा आहे, अशा शब्दांत डॉ. आढाव यांनी पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर’ शब्दप्रयोगावर टिप्पणी केली.

आढाव म्हणाले,की राष्ट्र सेवादलाचे संस्कार आणि सत्यशोधक समाज चळवळीच्या विचारांनी माझी जडणघडण झाली. आम्ही समाजवादी मंडळी पुस्तकं खूप वाचतो, पण समाजाचे वास्तव जाणून घेण्याची कृती महत्त्वाची आहे. समाजातील प्रश्नांना भिडले पाहिजे या उद्देशातून नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन मी संसदीय राजकारणातून बाहेर पडलो. सत्यशोधक समाजाच्या शताब्दीनिमित्त १९७३ मध्ये ‘एक गाव एक पाणवठा’ चळवळ सुरू केली. दोन वर्षांनी त्या अनुभवांवर आधारित पुस्तकाचे लेखन झाले. आणीबाणीमध्ये तुरुंगात असताना या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा तीन वर्षे एक गाव एक पाणवठा चळवळ केली. भीषण दुष्काळाच्या काळात पाणवठय़ांवर अस्पृश्यता पाळली जात होती. या ‘एक गाव एक पाणवठा’ने दलित चळवळीला वेगळे आयाम दिले. हमाल, रिक्षाचालक, कागद-काच-पत्रावेचक, बांधकाम कामगार अशा कष्टकऱ्यांना संघटित करण्याचे प्रयत्न सुरू झाले. ‘कष्टाची भाकर’च्या माध्यमातून कष्टकऱ्यांना अल्प दरात भोजन देण्याची व्यवस्था उभी राहिली.

ही इतिहासाची वाटचाल

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यापर्यंत आपला इतिहास थांबतो. त्यानंतरच्या काळात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा इतिहास पुढे नेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला तलवार दिली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी लेखणी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मताचा अधिकार दिला. ही आपल्या इतिहासाची वाटचाल ध्यानात घेतली पाहिजे, अशी भूमिका डॉ. बाबा आढाव यांनी मांडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 3:22 am

Web Title: social worker dr baba adhav express view over migrant workers zws 70
Next Stories
1 राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज
2 सातत्याचे श्रेय स्थानिक कर्मचारी, यांत्रिकीकरणाचे! 
3 सोलापुरच्या उपमहापौरांना शिंका आणि खोकला येत असल्याने सांगवी पोलिसांनी सोडले
Just Now!
X