स्मार्ट सिटी अशी ओळख असलेल्या शहरातील रस्ते खोदाई, रस्त्यांचे काँक्रिटीकरण हे विषय सध्या चर्चेचे ठरले आहेत. सिमेंट काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांना विरोध का, मानकांनुसार रस्त्यांची खोदाई होते का, रस्ते खोदाईचे धोरण नक्की काय, काँक्रिटीकरणाचे धोके कोणते, रस्ते खोदाईवरून सातत्याने गोंधळाची परिस्थिती का निर्माण होते, त्यात नागरिकांची भूमिका कोणती असावी, या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते आणि सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांच्याशी साधलेला संवाद.

रस्ते खोदाईचे सध्याचे धोरण नक्की काय आहे?

– सध्या सरसकट रस्त्यांची खोदाई करण्याचे धोरण महापालिकेने स्वीकारलेले दिसते. रस्ते खोदाई करताना वीज, पाणी, ड्रेनेज आदी भूमिगत सेवा वाहिन्यांचे नकाशे महापालिकेकडे उपलब्ध नाहीत. बीएसएनएल, एमएनजीएल या शासकीय कंपन्या, खासगी कंपन्या आणि महापालिकेच्या विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे एकच रस्ता वेगवेगळ्या कारणांसाठी सातत्याने खोदला जात आहे. त्यातून रस्त्यांची अंदाधुंदपणे खोदाई होत आहे.

रस्ते खोदाईचे आदर्श धोरण कोणते?

– ‘एक रस्ता-एक एकक’ हेच रस्ते खोदाईचे आदर्श धोरण आहे. सन २००६ मध्ये तत्कालीन आयुक्त नितीन करीर यांनी हे धोरण स्वीकारले. मात्र बारा वर्षांनंतरही त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. हे धोरण करताना काही तज्ज्ञ व्यक्तींनी शिफारशीही केल्या होत्या. रस्ते खोदाई करताना खोदाई कुठे होणार, कोणत्या कारणासाठी, त्यासाठी किती खर्च, कोणते काम आहे, याची माहिती फलकाद्वारे देणे अपेक्षित आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेट्स आणि लाल दिवे लावणे अशा उपाययोजनाही केल्या जात नाहीत. रस्ते दुरुस्तीही मानकानुसार होत नाही.

एक रस्ता-एक एकक म्हणजे नक्की काय?

– एकच रस्ता एकाच वेळी खोदणे आणि विविध सेवा वाहिन्यांची कामे करणे म्हणजे एक रस्ता एक एकक. रस्त्यावर आवश्यक असलेली सर्व कामे एकाच वेळी होणार असल्यामुळे अलीकडे सातत्याने होत असलेली रस्ते खोदाई यामुळे टाळता येणे शक्य आहे. विशेष म्हणजे याला महापालिकेने मान्यता दिली आहे. मात्र अंमलबजावणी अद्यापही होत नाही.

मानकांनुसार रस्ते खोदाई होते का?

– रस्ते खोदाई किंवा त्यांची दुरुस्ती ही मानकानुसार होत नाही. रस्ते करताना ते केंबर शेप (कासवाच्या पाठीप्रमाणे) असावेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उतार असावा, असे प्रस्तावित आहे. मात्र रस्ते करताना मध्यभागी ते खोल ठेवले जातात. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रमाण वाढते. रस्ते बांधणीच्या तत्त्वाचे पालनच होत नाही. रस्त्यांची दुरुस्ती किंवा मलमपट्टी करतानाही रस्त्याची पातळी एक सारखी ठेवली जात नाही. त्यामुळे तेथे गतिरोधक किंवा खड्डा तयार होतो.

खोदाई धोरणाची अंमलबावणी का होत नाही?

– रस्ते खोदाई धोरण बासनात गुंडाळले गेले आहे. वास्तविक शहराच्या दृष्टीने हे धोरण उपयुक्त आहे. पण या धोरणाची अंमलबजावणी न होण्यामागे काही कारणे आहेत. साधारपणे ३१ मार्च किंवा फारफार तर १५ एप्रिल पर्यंत रस्ते खोदाईला मान्यता देणे, त्यानंतर रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे करणे आवश्यक आहे. महापालिकेकडून त्याउलट भूमिका घेतली जाते. रस्ते खोदाईच्या प्रस्तावांना लवकर मान्यता दिली जात नाही. त्यामुळे ही कामे पावसाळा तोंडावर आला तरी सुरू राहतात. त्यामुळे रस्ता दुरुस्तीही तीन वेळा करावी लागते. त्यामुळे समन्वय ठेवून, वेळेत परवानगी आणि दुरुस्तीची कामे झाली, तर या धोरणासाठीही ते उपयुक्त ठरेल.

सिमेंट रस्त्यांचा आग्रहा का धरला जातो ?

– सिमेंटचे रस्ते कुठे करावेत, याबाबतचा निश्चित निकष आहे. ज्या रस्त्यावर जड वाहतूक मोठय़ा प्रमाणावर होते ते रस्ते आणि ज्या रस्त्यांवर पाणी साचण्याच्या समस्या आहेत ते रस्ते सिमेंटचे करावेत, असे प्रस्तावित आहे. इंडियन रोड काँग्रेस आणि स्टॅक कमिटीचीही तशी शिफारस आहे. मात्र गल्लीबोळात आता सिमेंटचे रस्ते करण्याचे पेव फुटले आहे. डांबरी रस्त्यांची तीन वेळा दुरुस्ती करावी लागते, त्याचा खर्च अधिक असतो, हे कारण त्यासाठी पुढे केले जाते. हे जरी योग्य असले तरी डांबरीकरण करताना उच्च दर्जाचे डांबर वापरले जाते का, गुणवत्तेनुसार कामे होतात का, याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळेच डांबरी रस्ते सातत्याने दुरुस्तीची वेळ येते.

सिमेंटचे रस्ते करताना काही निकष आहे का?

– सिमेंटचे रस्ते करताना वाळू वापरणे अपेक्षित आहे. या पद्धतीचे रस्ते करताना सिमेंट आणि खाणीतील निकृष्ट दर्जाची भुकटी वापरली जाते. त्यामुळे रस्त्यांची गुणवत्ता कमी होते. त्यातून रस्ते खराब होताता. सिमेंट रस्त्याचा खर्चही खूप आहे. सिमेंटचे रस्ते करताना सेवा वाहिन्या एका बाजूला असाव्यात, पाण्याचा निचार होण्याची यंत्रणा असावी, असे निकष आहेत. मात्र त्याची पूर्तता होत नाहीत.

रस्ते खोदाई धोरणाला विरोध होण्याची कारणे?

– रस्ते खोदाईचे धोरण उपयुक्त असले तरी यंत्राद्वारेच रस्त्यांची खोदाई करावी लागते. ही बाब खर्चिक असल्यामुळेच त्याला विरोध होत असावा. कमी खर्चात काम करण्याचा वाढता कल किंवा वृत्ती हेही त्यामागील एक कारण असू शकते. मात्र शहराच्या दृष्टिकोनातून या धोरणाची काटेकोरपणे अंमलबाजवणी होणे अपेक्षित आहे.

रस्ते खोदाईच्या धोरणाची अंमलबजावणी होऊ शकते का?

– रस्ते खोदाईच्या धोरणाची निश्चितच अंमलबजावणी होऊ शकते. महापालिकेच्या दोन विभागात त्यासाठी समन्वय असावा. खासगी कंपन्या आणि अन्य शासकीय कंपन्यांचे पुढील काही वर्षांचे नियोजन झालेले असते. त्याची माहिती घेऊन समन्वय साधून रस्ते खोदाईला मान्यता देता येईल. रस्ते खोदाईच्या प्रस्तावांना वेळेत परवानगी, नियोजित वेळेतील रस्ते दुरुस्ती, शासकीय यंत्रणांमधील समन्वय यामुळे शहरातील रस्ते सुस्थितीमध्ये राहू शकतात.

अनावश्यक रस्ते खोदाई टाळता येईल का?

– गल्लीबोळ, प्रमुख रस्ते, उपरस्ते, जोड रस्त्यांवर विनाकारण खोदाई केली जाते. नगरसेवकांच्या अंदाजपत्रकातील निधी संपविण्यासाठी हा प्रकार केला जातो. मात्र नागरिकांनीच आता पुढे येऊन त्या विरोधात आवाज उठविणे आवश्यक आहे. यापूर्वीही काही ठिकाणी नागरिकांनी चुकीच्या पद्धतीने होणारी किंवा विनाकारण होणारी कामे बंद पाडली आहेत. लोकसहभागातूनच हे शक्य होणार आहे.