ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे मत

सध्याचे सरकार हे भारतीय जनता पक्षाचे किंवा नरेंद्र मोदी यांचे नाही, तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहे. या लोकांनी धार्मिक तेढ वाढविण्याचा दृढनिश्चय केला आहे. त्यामुळे ‘सब का साथ, सब का विकास’ ही घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. स्वत:ला फकीर म्हणवून घेणारे मोदी हे महात्मा गांधी यांच्यासारखे खरे फकीर नाहीत, तर ते चकचकीत फकीर आहेत. या धर्मभेदी लोकांपासून समाजाचे रक्षण करण्यासाठी बंधुतेचा विचार नेटाने पुढे न्यायला हवा, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी मंगळवारी व्यक्त केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या समारोपात वैद्य बोलत होते. सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. रझिया पटेल आणि प्रसिद्ध साहित्यिक रामनाथ चव्हाण यांना ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. बाबुरावजी घोलप महाविद्यालयाला प्रदान करण्यात आलेला ‘स्वामी विवेकानंद पुरस्कार’ प्राचार्य मनोहर चासकर यांनी स्वीकारला. मोहनराव म्हस्के यांच्या ‘दुष्काळाच्या गर्भातून पँथरची डरकाळी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रकाश रोकडे, डॉ. विजय ताम्हाणे, डॉ. भालचंद्र भागवत, शंकर आथरे, महेंद्र भारती, उद्धव कानडे या वेळी उपस्थित होते.

वैद्य म्हणाले, भारतापाठोपाठ अमेरिकतही सत्तापालट झाल्याने संकुचित विचारांचे प्रवाह जोराने वाहत आहेत. मुसलमानांना शत्रुत्वाची वागणूक दिली जाऊ लागली आहे. िहदूराष्ट्राची निर्मिती असे ध्येय असलेले लोक देशद्रोही आणि देशप्रेमाचे शिक्के मारू लागले आहेत, ही अतिशय गंभीर बाब आहे. या आव्हानांचा सामना करून बंधुतेचे मूल्य रुजविण्याची गरज आहे. देशाची धर्माधारित रचना नेहमी घातक असते. ती यशस्वी होत नाही. मुस्लीम राष्ट्रांमध्ये शिया-सुन्नी असा वाद दिसतो. त्याप्रमाणे आपल्याकडे धर्माधर्मात वाद निर्माण होणे शक्य आहे. त्यामुळे िहदुराष्ट्राची संकल्पना अस्वीकाहार्य आहे.

वेगवेगळ्या जातीचे मोच्रे पाहिल्यानंतर कोणी मानवतेचा मोर्चा का काढत नाही, असा प्रश्न उपस्थित करून उल्हास पवार म्हणाले, वंशवाद, जातीवाद प्रबळ होत आहे. अशा वेळी सामाजिक अभिसरण होणे खूप गरजेचे आहे. जातिअंताचा लढा तीव्र व्हायला हवा. मानवता हाच धर्म आणि भारतीय हीच ओळख हा विचार आपल्या मनात रुजला, तर देशाची एकात्मता कायम राहू शकेल. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा उद्योग सत्ताधाऱ्यांनी बंद केला पाहिजे.

रझिया पटेल म्हणाल्या, स्वातंत्र्यानंतरही महिलांचे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. माणुसकीचे अध:पतन झाल्याने दु:ख आणि वेदना वाढत आहेत. सध्याच्या सत्ताधाऱ्यांमधील असंवेदनशीलता पाहून मन व्यथित होते. हे सगळे थांबविण्यासाठी आपण सर्वानी हातात हात घालून बंधुतेची भावना बळकट करायला हवी.

रामनाथ चव्हाण म्हणाले, समता आणि बंधुतेचा विचार बोथट होतो आहे. जातीचे संघटन, मोच्रे प्रबळ होत आहेत. जातीनिर्मूलन आणि जातीचे उच्चाटन केल्याशिवाय देशामध्ये ‘अच्छे दिन’ येणार नाहीत. माझ्या साहित्य निर्मितीतून मी तोच प्रयत्न केला आहे.

रोकडे म्हणाले, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये समाजात रुजविण्यासाठी अशा साहित्य संमेलनांची भूमिका महत्त्वाची राहील. समाज एकसंध ठेवण्यासाठी भविष्यातील संमेलने प्रयत्न करतील.