औद्योगिक व व्यावसायिक वीजग्राहकांतील वीजचोरांना मागील काही दिवसांपासून महावितरण कंपनीकडून चांगलाच झटका देण्याची मोहीम सुरू असताना दोन-तीन दिवसाला एक बडा वीजचोर हाती लागत आहे. या मोठय़ा वीजचोरांबरोबरच आता घरगुती वापराच्या वीजजोडांमधून होणाऱ्या वीजचोरीवरही महावितरणने लक्ष्य केंद्रित केले आहे. त्यात हडपसर भागामध्ये एका सोसायटीतही वीजचोरी आढळून आली. त्यामुळे या सोसायटीतील रहिवाशांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
वीजचोऱ्यांच्या माध्यमातून वीज वितरण कंपनीला लाखोंचा गंडा घालणाऱ्या बडय़ा वीजचोरांच्या विरोधात मागील एक महिन्यापासून धडक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमध्ये प्रामुख्याने रिमोट कंट्रोलचा वापर करून वीजचोरी करणारे उद्योजक महावितरणच्या जाळय़ात सापडले आहेत. त्याबरोबरीनेच व्यावसायिक वीजजोड असणारे हॉटेल, पिठाच्या गिरण्या आदी ठिकाणीही वीजचोऱ्या शोधण्यात येत असून, त्यातून काही वीजचोर हाती लागत आहेत. सुमारे महिनाभरात महावितरणने अशा प्रकारे ऐंशी ते नव्वद लाखांपर्यंतची वीजचोरी पकडून संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.
औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांबरोबरच घरगुती ग्राहकांमधील वीजचोरांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. त्यानुसार हडपसर भागामध्ये तीन प्रकरणांत साडेसहा लाख रुपयांची वीजचोरी उघड झाली असून, १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या तीन प्रकरणांत एका सोसायटीचाही समावेश आहे. गाडीतळ भागामधील अर्चना अपार्टमेंट या सोसायटीमध्ये जिन्यातील वीजदिव्यांसाठी अनधिकृतपणे विजेचा वापर करण्यात येत होता. या प्रकारातून सोसायटीने १५ हजार ५७० युनिटच्या एक लाख १३ हजारांच्या विजेची चोरी केल्याचे उघड झाले. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
वीजबिलाच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केला असतानाही अनधिकृतपणे वीजपुरवठा घेऊन विजेची चोरी करण्याचे प्रकारही उघड झाले आहेत. अशा दोन प्रकरणांमध्ये सुमारे पाच लाखांची वीजचोरी झाली आहे. वीजखांबावर आकडे टाकून किंवा मीटरचा संपर्क टाळून थेट वीजचोरी करण्याचे प्रकार वस्त्या किंवा झोपडपट्टय़ांमध्ये सापडतात. मात्र, सोसायटीमध्येही सभासदांच्या सहमतीने वीजचोरी होण्याचा हा प्रकार नवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.