करोना महामारीमुळे माणूस माणसांपासून काहीसा दुरावत चालल्याचे दिसत असताना, कुठतरी अद्यापही माणुसकीचा झरा शिल्लक आहे याचा प्रत्यय देणारी घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वयाच्या सत्तरीत देखील सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या व्यक्तीचा सायकलवरून पडून अपघात झाला. परिस्थिती बिकट असल्याने उपचारासाठी गाठीशी पैसे देखील नसल्याने, मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अशावेळी या सुरक्षा रक्षकाच्या मदतीसाठी सोसायटीधारक सरसावले. त्या सर्वांनी पैसे जमा करून सुरक्षा रक्षकावर उपचार केले.

दरम्यान, उपचारसाठी पैसे नसल्याने १३ टक्के व्याजाने पैसे आणण्याची वेळ सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबावर आली होती असे स्वतः अपघातग्रस्त वृद्ध सुरक्षा रक्षक मनोहर शिंदे यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना सांगितले आहे.

गरीब परिस्थती असल्याने वयाच्या सत्तरीत देखील हे काम करण्याची जिद्द मनोहर यांच्यात होती. मागील चार वर्षांपासून ते पिंपळे गुरवमधील करण पॅराडाईज या सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामावर होते. यातून मिळणाऱ्या पैशांमधून ते कुटुंबं चालवत. दरम्यान, करोना महामारीचे संकट आले. मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाउन लागू करण्यात आला. शिवाय, करोनाबाधित रुग्ण वाढल्याने रस्ते ही वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. परंतु, मनोहर यांनी आपली कामाची जिद्द सोडली नाही. बोपोडीमधून नाशिक फाटा मार्गे पिंपळे गुरव येथील सोसायटी ते नियमीत सायकलवरून जवळपास सात किलोमीटरचा प्रवास करून कामासाठी येत राहिले.

महामारीच्या संकटा असतानाही सोसायटीधारकांना कोणतीच कारणं न सांगता, त्यांनी आपले काम प्रामाणिकपणे केले. दरम्यान, कामावरून सायकलद्वारे घरी परतत असताना सायकलच्या पॅडलवरील पाय निसटल्याने ते खाली पडले, वृद्ध असल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. यानंतर मुलाला बोलवून ते बोपोडी येथील घरी गेले. दुसऱ्या दिवशी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. खासगी रुग्णालयातील खर्च त्यांना न झेपणारा होता. याची माहिती करण पॅराडाईज सोसायटीधारकांना मिळाली. सोसायटीचे चेअरमन अमृत झांबरे आणि प्रशांत पवार यांच्यासह इतर सोसायटीधारकांनी तात्काळ वेळ न दवडता मनोहर शिंदे यांच्यासाठी पैसे जमा केले आणि त्यांच्यावर पुढील उपचार केले. हे सर्व करत असताना पैसे परत मिळतील ही अपेक्षा न ठेवतात आणि मनोहर हे पुन्हा कामावर रुजू होणार नाहीत हे माहीत असतानाही सोसायटीधारकांनी त्यांना आर्थिक मदत केली.

सध्या मनोहर शिंदे हे त्यांच्या घरी अंथरुणाला खिळून आहेत. मनोहर यांनी महामारीच्या संकटात असतानाही सोसायटीमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी वयाच्या सत्तरीतही जबाबदारीने नोकरी केली. याची जाण ठेवून त्यांच्या संकटात मदत करत माणुसकीचा झरा अद्याप ही शिल्लक आहे, याचे उदाहरण करण पॅराडाईज सोसायटीधारकांनी घालून दिले आहे.