सदनिकाधारकांना त्यांच्या सदनिकेची निर्वेध मालकी मिळवून देण्याच्या दृष्टीने कोथरूड विधानसभा मतदारसंघातील सोसायटय़ांसाठी बुधवारी (२३ जुलै) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. डिम्ड कन्व्हेयन्स तसेच महापालिकेशी संबंधित विविध प्रश्नांबाबत यावेळी मार्गदर्शन केले जाईल. प्रबोधन विचारधारा संस्थेतर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कोथरूडचे आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी मंगळवारी ही माहिती दिली. यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात सायंकाळी साडेपाच वाजता हा मेळावा होणार असून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, जिल्हा उपनिबंधक किरण सोनवणे, सहनिबंधक निलिमा धायगुडे, पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे, जिल्हा सहकारी गृहरचना महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, सचिव अॅड. जयंत कुलकर्णी यांची मेळाव्यात प्रमुख उपस्थिती असेल. कोथरूड, कर्वेनगर ते पाषाण, बाणेर, बालेवाडी पर्यंतच्या भागातील नागरी समस्या तसेच सोसायटय़ांच्या समस्या, वाहतूक अन्य प्रश्नांबाबत या मेळाव्यात संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे मोकाटे यांनी सांगितले. या मेळाव्यात मतदारसंघातील नागरिकांनी तसेच सोसायटय़ांचे सदस्य, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार मोकाटे यांनी केले आहे.