दिवसेंदिवस कोळशाची उपलब्धता कमी होत असल्याने वीजनिर्मितीवर येणाऱ्या मर्यादा व कोळसा किंवा गॅसच्या माध्यमातून होणाऱ्या वीजनिर्मितीतून होणारे प्रदूषण लक्षात घेता अपारंपरिक स्रोतावर आधारित वीजनिर्मितीच्या प्रकल्पाकडे सध्या लक्ष देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बारामती तालुक्याची शिर्सुफळ येथे महानिर्मिती कंपनीने सौरऊर्जा प्रकल्प उभारला असून, नुकताच तो कार्यान्वितही करण्यात आला.28baramati खासगी लोकसहभागातून (पीपीपी मॉडेल) हा प्रकल्प उभारण्यात आला असून, ऊर्जा क्षेत्रामध्ये या मॉडेलनुसार उभारण्यात आलेला हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरला आहे.
अनेक दृष्टीने वैशिष्टय़पूर्ण असलेला हा प्रकल्प ग्रीड कनेक्टेड असल्याने आता बारामतीतून इतरांनाही सौरऊर्जेचा प्रकाश मिळू शकणार आहे. तत्कालीन ऊर्जामंत्री अजित पवार यांच्या कार्यकालामध्ये १३ जुलै २०१४ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करून त्यातून विजेची निर्मितीही सुरू करण्यात आली आहे. सौरऊर्जेच्या या प्रकल्पाची एकूण क्षमता ५० मेगावॉट विजेच्या निर्मितीची आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ३६ मेगावॉटचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्याचे कामही सुरू आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने विजेची निर्मिती केली जाईल. या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे ८३ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती अपेक्षित आहे.
सुमारे ७४ हेक्टरच्या विस्तीर्ण क्षेत्रामध्ये उभारण्यात आलेला हा प्रकल्प पुणे जिल्ह्य़ातील सौरऊर्जा निर्मितीचा सर्वात मोठा प्रकल्प ठरला आहे. उभारणीमध्ये खासगी सहभाग असला, तरी महानिर्मिती कंपनीला त्यातून खात्रीशील महसुली परतावा मिळण्याची तरतूद आहे. त्याचप्रमाणे प्रकल्पाची पूर्ण मालकी महानिर्मिती कंपनीची राहणार आहे. खासगी लोकसहभागातून ऊर्जा क्षेत्रात उभारलेला देशातील हा पहिलाच प्रकल्प असून, या नव्या संकल्पनेचा स्वीकार करणारी महानिर्मिती ही पहिलीच वीजनिर्मिती कंपनी ठरली आहे. महानिर्मिती कंपनीचा साक्री येथे १२५ मेगावॉटचा, तर चंद्रपूर येथे पाच मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प आहे. त्यात आता शिर्सुफळ येथील प्रकल्पाची भर पडली असल्याने महानिर्मिती कंपनीची एकूण सौरऊर्जा स्थापित क्षमता आता १८० मेगावॉट होणार आहे. त्याचा फायदा वीजग्राहकांना मिळू शकेल.
——–
‘‘ शिर्सुफळ येथील सौरऊर्जा प्रकल्पाचा दुसरा टप्पा जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू होईल. सौरऊर्जा एक स्वच्छ ऊर्जा असून, प्रदूषणमुक्त असल्याने या वीजनिर्मितीला महत्त्व आहे.’’
– महेश आफळे, महानिर्मिती, जनसंपर्क अधिकारी