आपल्या शाळेविषयी आत्मीयता बाळगणाऱ्या ज्ञान प्रबोधिनी प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांमुळे आणि निधी संकलनामुळे शाळेला सौर विद्युतनिर्मिती प्रकल्पाची अनोखी भेट मिळाली आहे. माजी विद्यार्थ्यांनी शाळेशी विचारविनिमय करून सौर विद्युतनिर्मिती संच बसवून दिला.

ज्ञान प्रबोधिनी प्रशालेतून १९८९ मध्ये दहावीची परीक्षा दिलेल्या माजी विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाच्या कामात पुढाकार घेतला. माजी विद्यार्थ्यांच्या एकत्र भेटीत शाळेसाठी काहीतरी प्रत्यक्ष करण्याची कल्पना पुढे आली आणि निधी संकलन करून ठोस उपक्रम हाती घेण्याचे ठरले. प्रत्यक्ष निधी संकलनाला सुरुवात केल्यानंतर काही माजी विद्यार्थ्यांनी ज्ञान प्रबोधिनीचे कार्यवाह सुभाष देशपांडे यांची भेट घेतली आणि त्यांनी सुचविल्याप्रमाणे प्रशालेच्या सदाशिव पेठ येथील वास्तूवर सौर विद्युतनिर्मिती प्रकल्प उभारण्याचे या गटातर्फे ठरवण्यात आले. जास्तीत जास्त निधी संकलित करून मोठय़ा क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचा या गटाने निर्धार केला. माजी विद्यार्थ्यांच्या या गटाने अनेक जणांची भेट घेऊन तीन लाख रुपये गोळा केले. माजी विद्यार्थी गणेश जाधव याने त्यासाठी पुढाकार घेऊन वेळोवेळी पाठपुरावा केला. सौर विद्युतनिर्मिती क्षेत्रातच काम करणाऱ्या प्रदीप परांजपे या आणखी एका माजी विद्यार्थ्यांने या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष उभारणीत हातभार लावला. हिमांशू तुळपुळे आणि राहुल रावत या वास्तुरचना क्षेत्रात काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी या सौरप्रकल्पात शाळेच्या गच्चीचा वापर कसा कमीत कमी होईल व उर्वरित जास्तीत जास्त गच्ची कशी वापरासाठी उपलब्ध राहील हे बघितले. मूळ प्रकल्पासाठी सात लाख रुपयांचा खर्च आला असून मर्यादित जागेचा वापर होण्यासाठी उभारलेल्या यंत्रणेचा खर्च चार लाखांपर्यंत आला आहे. माजी विद्यार्थ्यांच्या निधी व्यतिरिक्तची रक्कम प्रबोधिनीने अन्य देणग्यांमधून उभारली आहे. १० किलोवॅट क्षमतेच्या सौर विद्युतनिर्मिती प्रकल्पाची उभारणी या प्रकल्पात करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या मेडा मार्फत या सौर प्रकल्पासाठी १.८७ लाख रुपयांचे अनुदानही मंजूर करण्यात आले आहे.

कार्यान्वित झालेल्या या सौर प्रकल्पातून सध्या दररोज सरासरी ३५ युनिटची विद्युतनिर्मिती होत असून त्यामुळे महिन्याला सुमारे १२ हजार रुपयांची बचत विजेच्या बिलात होत असल्याची माहिती सुभाष देशपांडे यांनी दिली. याच धर्तीवर निगडी प्राधिकरणातील ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या वास्तूवर ८.५ किलोवॅट क्षमतेच्या सौर विद्युतनिर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्यात आल्याची माहिती  केंद्रप्रमुख मनोज देवळेकर यांनी दिली. निगडीतील शाळेची गच्ची मोठी असल्याने मोठय़ा क्षमतेचा सौर विद्युतनिर्मिती प्रकल्प हाती घेण्यात येत असल्याचेही देवळेकर यांनी सांगितले.