लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांची माहिती

डोळ्यांत तेल घालून देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय लष्करातील सनिकांच्या शौर्याची गाथा आता ‘सीबीएसई’च्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होणार आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये या सनिकांसोबतच सीमेवर हौतात्म्य पत्करलेल्या सनिकांच्या प्रतिमांचे विशेष दालन साकारण्यात येणार आहे. लष्कराच्या या प्रस्तावाला मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्यावर लवकरच निर्णय होऊन येत्या शैक्षणिक वर्षांपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी गुरुवारी दिली.

बी. एन. श्रीवास्तव फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात रावत बोलत होते. रावत यांच्या हस्ते सनिकांना शुभेच्छापत्रे पाठविणाऱ्या १६ शाळांचा आणि दोन महाविद्यालयांचा सन्मान करण्यात आला. सनिकांना सात हजार शुभेच्छापत्रे पाठविणाऱ्या डीएव्ही शाळेला फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ फिरता चषक प्रदान करण्यात आला. विवा इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाइड आर्ट्सला लेफ्टनंट कर्नल आर्देसर चषक प्रदान करण्यात आला. तिरंदाजीमध्ये प्रावीण्य दाखविणारे लेफ्टनंट कर्नल विक्रम धायल यांच्यासह पत्नी ईश्वरी, खुशबू, दिव्या आणि दिग्विजय या कुटुंबाचा सन्मान करण्यात आला. रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे, त्यांच्या पत्नी अर्चना पांडे, फाउंडेशनचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल गौतम बॅनर्जी (निवृत्त), समन्वयक विजयकुमार श्रीवास्तव आदी उपस्थित होते.

रावत म्हणाले,की सीमेवर लढणाऱ्या सनिकांच्या शौर्य, पराक्रम आणि त्यागाची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे. त्यासाठी लष्कराकडून प्रयत्न सुरू असतात. त्याचाच भाग म्हणून सीमेवर हौतात्म्य पत्करावे लागलेल्या सनिकांची माहिती       विद्यार्थ्यांना पुस्तकांमधून मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सीमेवर पराक्रम करून शौर्यपदकाचे मानकरी ठरलेल्या सनिकांची माहिती असलेले पुस्तक गेल्या महिन्यातच प्रकाशित करण्यात आले आहे. हौतात्म्य पत्करावे लागलेले सैनिक आणि शौर्यपदकाचे मानकरी असलेल्या सनिकांची माहिती विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमात मिळण्यासाठी या पुस्तकाचा ‘सीबीएसई’च्या पुस्तकात समावेश करण्याची मागणी मनुष्यबळ विकासंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे. याबाबत येत्या शैक्षणिक वर्षांपासून सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन जावडेकर यांनी दिले आहे. हुतात्मा आणि पदकविजेत्या सैनिकांची माहिती विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षांपासून महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये विशेष दालन तयार करण्यात येणार आहे. तीनही ऋतूंमध्ये प्रतिकूलतेवर मात करीत सीमेवर लढणाऱ्या सनिकांना शुभेच्छापत्रे आणि राख्या पाठवून तुम्ही सनिकांना आनंद देता यासाठी सनिकांतर्फे मी तुमचे आभार मानतो, असेही रावत यांनी सांगितले.