|| श्रीराम ओक

आरोग्य आणि शिक्षण दोन्हीही तेवढेच महत्त्वाचे विषय. त्यातही लहान मुलांच्याबाबतीत तर या दोन्हीला अधिकच महत्त्व. उत्तम आरोग्य आणि शिक्षण असेल, तर त्या मुलांचा भविष्यकाळ उज्ज्वल होऊ शकतो. आरोग्य उत्तम असेल, तर शिक्षणात रस वाटू शकतो आणि योग्य पद्धतीने शिक्षण घेतलेले असेल, तर आरोग्याचा आणि सुदृढतेचा विचार केला जाऊ शकतो. याच विचाराने २०११ मध्ये सुरू झाले ‘स्नेह फाउंडेशन’चे कार्य. पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात ही संस्था कार्यरत आहे.

वस्तीपातळीवरील मुलांना आरोग्य आणि शिक्षण या दोन्हींबाबत स्नेह वाटावा, या उद्देशाने एक दिवसीय कार्यक्रमांच्या माध्यमातून सुरू झालेले स्नेह फाउंडेशनचे कार्य विस्तारले आहे. सुरुवातीच्या काळात वस्त्यांमध्ये जाऊन, अंगणवाडीमध्ये जाऊन शिकवण्यापासून चप्पल दान देण्यापर्यंत विविध प्रकारे कार्यक्रम संस्थेतर्फे घेतले जात होते. पण हे कार्यक्रम तात्पुरत्या स्वरूपाचे असल्याचे लक्षात आल्यामुळे वस्तीपातळीवरील सर्वासाठी दीर्घकालीन उपायोग होईल, असे काहीतरी करावे असे लक्षात आल्यानंतर या फाउंडेशनची स्थापना डॉ. पंकज बोहरा आणि त्यांच्या पत्नी श्वेता जैन यांनी काही स्वयंसेवकांबरोबर मिळून केली. रठएऌ म्हणजे Solid Nutrition Education and Health.  या नावाप्रमाणेच पोषण, आरोग्य आणि शिक्षण या विषयांवर संस्था कार्यरत आहे.

वंचित वस्त्यांमधील लहान मुले तसेच गरोदर माता, किशोरवयीन मुली, पालक आणि एकूण सगळ्याच वस्तीपर्यंत आरोग्य, पोषण आणि शिक्षणाच्या सुविधा पोहचाव्यात, या उद्देशाने संस्थेने काम सुरू  केले. तीन ते सहा वयोगटातील मुले, ज्यांना या वयात विविध खेळ, अक्षरे, संख्या, भाषा, शारीरिक कौशल्य या बाबत शिक्षण आणि पुरेसे उत्तेजन मिळायला हवे, ते त्यांना मिळत नाही. ही मुले वस्तीमध्ये घरात एकटीच बसलेली असतात किंवा वस्तीमध्ये दिवसभर काहीही न करता भटकत असल्यामुळे सहा वर्षांनंतर या मुलांना सरकारी शाळेत दाखल केले जाते. पण तीन ते सहा वयोगटात काहीही शिक्षण न मिळालेल्या मुलांना पहिलीचा व नंतर सर्वच इयत्तेचा अभ्यासक्रम समजणे अवघड गेल्याने त्या विद्यार्थ्यांचे नाव शाळेतून काढले जात होते. या तीन ते सहा वर्षांच्या मुलांना व त्यांचा पालकांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे या दृष्टिकोनातून ‘स्नेह कम्युनिटी प्री-स्कूल’ उदयास आले. काळेवाडीमधील वंचित वस्तीमध्ये पहिली इंग्रजी माध्यमाची प्री-स्कूल स्थापन झाली. जी फक्त गरीब विद्यार्थ्यांकरिता कार्यरत आहे.

मुलांना बालवाडीचे शिक्षण देण्याबरोबरच, पालकांसाठी स्पर्धा, त्यांच्यासाठी शिक्षण, आरोग्य, कुपोषण, बचत, सरकारी सुविधा इ. अनेक विषयांवर चर्चासत्र घेण्यास सुरुवात झाली. शिशु गटापासून मोठय़ा गटापर्यंत तीन इयत्ता या शाळेत सुरू झाल्या. त्यानंतर २०१७ मध्ये स्नेह प्री-स्कूल ची दुसरी शाखा शांतिनगर (भोसरी) या वंचित वस्तीमध्ये स्थापन झाली तर नंतरची २०१८ मध्ये कालाखडक (वाकड), बालाजीनगर (भोसरी), केळेवाडी (कोथरूड) अशा आणखी तीन वस्त्यांमध्ये स्नेहच्या शाखा सुरू  झाल्या. आतापर्यंत स्नेह प्री-स्कूल मधून ६०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून बालवाडीचे शिक्षण मिळाले आहे. तसेच त्यांचा सर्वागीण विकास व्हावा, यासाठी देखील संस्थेमार्फत विशेष प्रयत्न केले गेले आहेत.

मुलांना शिक्षण देण्याबरोबरच वेळच्या वेळी त्यांची आरोग्य तपासणी, तसेच त्यांच्या पालकांना पौष्टिक आहार कसा बनवावा, अंगणवाडीतून मिळणारे धान्य घरी नेऊन त्यापासून विविध पदार्थ कसे बनवावे याचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय शिक्षणाचे महत्त्व सांगितले जाते. पालकांचे सबलीकरण करण्याबरोबरच गरजवंत पालकांना रोजगार मिळवून देण्यास मदत करणे आदी कामेही प्री-स्कूल मार्फत केली जातात. या शाळांमध्ये येणाऱ्या मुलांना शिक्षण पूर्णत: मोफत दिले जाते.

तीन ते सहा वयोगटातील मुलांबरोबरच वस्तीमधील मोठय़ा मुलांसाठी ‘ज्ञान’ प्रकल्पाद्वारे सर्वागीण विकासाचे वर्ग कालाखडक आणि शांतिनगर वस्तीमध्ये घेतले जातात. या वर्गात मुलांना साक्षरता, विविध कौशल्ये, अभ्यासेतर विषय म्हणजेच कला, वाचन, खेळ, विज्ञान प्रकल्प आदी  शिकविले जाते. या वर्गामधील मुलांनी  विविध आंतरशालेय तसेच आंतरसंस्था पातळीवर विविध कला प्रदíशत करून  पारितोषिके पटकाविली आहेत.  कालाखडक मध्ये राहणाऱ्या रेश्मा ढोले या मुलीने याच वर्गातून शिकून स्नेहच्या मदतीने बीबीएचे शिक्षण घेतले. तसेच एमबीएसाठी शिष्यवृत्ती मिळविली आहे. आता ती रोज संध्याकाळी ज्ञान प्रकल्पामध्ये शिकविण्यास येते. या प्रकल्पातून मुलांना साक्षर आणि स्वावलंबी बनविण्याचे काम तसेच ही मुले पुढे जाऊन वस्तीतील बाकीच्या मुलांपर्यंत ज्ञानार्जनाचे काम करतील या दृष्टिकोनातून हा प्रकल्प राबविला जात आहे.

प्री-स्कूल बरोबरच पिंपरी-चिंचवडमधील वंचित वस्त्यांमध्ये कुपोषण निर्मूलनासाठी प्रकल्प राबवला जात आहे. ० ते ५ वयोगटातील्  कुपोषित मुलांना शोधणे, त्यांना औषधीय खाऊ आणि त्यांच्यावर योग्य ते उपचार करून, त्यांच्या पालकांना व वस्तीमधील सर्व लोकांना कुपोषणाविषयी माहिती देणे, असा एक वर्षांचा प्रकल्प राबवला जातो. आजपर्यंत संस्थेने एक हजाराहून अधिक कुपोषित मुलांवर उपचार केले आहेत. श्रद्धा देव या संस्थेच्या कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत असून संस्थेचे काम जाणून घेण्यासाठी ९०२८११७७०० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

कुपोषणावर काम करताना कार्यकर्त्यांना गरोदर माता तसेच किशोरवयीन मुलींच्या रक्तक्षय (अ‍ॅनिमिया), तसेच मासिक पाळीच्या प्रश्नांवर काम करण्याची गरज लक्षात आली आणि त्यातून ‘वात्सल्य’ प्रकल्पही राबविण्यास फाउंडेशनतर्फे सुरुवात झाली. २०१८-१९ पासून संस्था जर्मनीच्या गोटीनगन महाविद्यालयाबरोबर बचत या विषयीचा प्रकल्पही वंचित वस्त्यांमध्ये राबवत आहे. समाजातील विविध स्तर आणि त्यांच्या गरजा ओळखून मुलांवर शिक्षणाचे आणि त्याबरोबरच सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक ते संस्कार झाल्यास उद्याची पिढी अधिक सक्षम बनेल, असा विश्वास वाटतो.

shriram.oak@expressindia.com