अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांवरून आसाराम बापू यांना अटक होऊनही ते निर्दोष असल्याचे सांगत त्यांचे समर्थन करण्यासाठी शहरातील काही संघटनांनी रविवारी मोर्चा काढला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांना खरे हल्लेखोर सापडत नसल्यामुळेच सनातन संघटनेला लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही या वेळी केला गेला.
पर्वती पायथ्यापासून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकापर्यंत निघालेल्या या मोर्चात सनातन प्रभात, समस्त हिंदू आघाडी, हिंदू जनजागृती समिती, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान आणि आसाराम बापू संप्रदाय या संघटना सहभागी झाल्या होत्या.
हिंदू धर्मगुरूंना चर्चेला न बोलवता केवळ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मतानुसार जादूटोणाविरोधी कायदा आणण्यात आला असल्याचे फलक या मोर्चात लावण्यात आले होते. ‘हा कायदा संतांना अटक करून हिंदूंच्या धर्मश्रद्धांचे निर्मूलन करणारा आहे’ तसेच ‘आसाराम बापूंची अपप्रसिद्धी करणारी प्रसारमाध्यमे विकली गेली आहेत’, अशा आरोपाच्या घोषणाही या वेळी दिल्या गेल्या.