पुणे : शहरात सरसकट बंदी असूनही अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे आणि काही भागात करोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे पुढील टप्प्यात शहराचे काही भाग सील करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत.

करोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे शहरात सध्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार शहरात संचारबंदी, वाहतूक बंदी करण्यात आली आहे. मात्र नागरिकांकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी नागरिकांचा मुक्त संचार सुरू असल्याचे दिसून येत आहे. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिक एका भागातून दुसऱ्या भागात विनासायास जात आहेत. त्यामुळे करोना विषाणूचा संसर्गही वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. सिंहगड रस्ता, कोथरूड, मध्यवर्ती भागातही नागरिक विनाकारण रस्त्यावर येत असल्याचे सातत्याने पुढे आले आहे.

सरसकट बंदी असतानाही आदेशाचे पालन होत नसल्यामुळे करोना विषाणूचा संसर्ग वाढत असून दररोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. महर्षिनगर, कोंढव्यासह या लगतच्या पेठांमधील भागात सोमवारी सर्वाधिक रुग्ण आढळून आल्यामुळे हा भाग सील करण्यात आला आहे.

या भागात नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली असून त्याची काटेकोर अंमलबजावणी पोलीस, जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाली आहे. परिसर सील के ल्यामुळे नागरिकांचीही मोठी अडचण होणार आहे. के वळ औषधांसाठीच नागरिकांना बाहेर पडता येणार आहे.

या परिस्थितीत अन्य ठिकाणी नागरिकांकडून निष्काळजीपणा दाखविला जात असल्यामुळे काही भागही सील करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. नागरिक विनाकारण रस्त्यावर येत असल्यास, वस्तू खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे काही भागात आढळून आले आहे. त्यामुळे हा भाग सील करण्यात येणार आहे.