कोरेगाव भीमा प्रकरणी अटकेत असलेले मिलिंद एकबोटे यांना काळे फासण्याचा प्रयत्न न्यायालयाच्या आवारात झाला. मिलिंद एकबोटे यांना कोरेगाव भीमा प्रकरणी चिथावणी दिल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशात त्यांना न्यायालयातून बाहेर नेत असताना काळे फासण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एकबोटे यांच्या समर्थकांनी काही काळ न्यायालयाच्या आवारात गोंधळ घातला. तसेच काही जणांनी मिलिंद एकबोटेंवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला अशीही माहिती समोर येते आहे.

१ जानेवारी २०१८ ला कोरेगाव भीमा या ठिकाणी दोन गटांमध्ये हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारामागे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांची चिथावणी कारणीभूत होती असा आरोप झाला. तसेच या दोघांविरोधात हिंसा भडकवण्याचे गुन्हेही दाखल झाले. या प्रकरणी काही दिवसांपूर्वीच मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता काही जणांनी मिलिंद एकबोटेंवर हल्ला चढवत त्यांच्यावर काळे फासण्याचा प्रयत्न झाला.

१ जानेवारीला कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला अभिवादन करून येताना दलित बांधवांवर दगडफेक झाली. त्यानंतर मोठा हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात एकाचा मृत्यूही झाला. या हिंसाचारामागे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या दोघांची चिथावणी असल्याचे समोर आले त्यानंतर भारीप बहुजन महासंघाने मुंबई बंदचीही हाक दिली होती. तसेच हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संभाजी भिडे अर्थात भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी मिलिंद एकबोटेंना अटक झाली आहे. तर संभाजी भिडे यांना अटक न केल्यास २६ मार्चला मुंबईत मोर्चा आणणार असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.