नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिराने सुरू झालेला कार्यक्रम, जवळपास दीड तास चाललेले मुख्यमंत्र्यांचे भाषण, तरीही विविध शंका व प्रश्न असणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना भंडावून सोडले. एकीकडे दारूबंदी जाहीर करता मग दारूची दुकाने सुरू कशी राहतात, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळाले. मात्र, लोकसभेचे काय, अशा अडचणींच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांना कसरत करावी लागली. लोकसभेत महिलांना आरक्षण देण्याचा पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचा ठाम निर्धार असल्याचे स्पष्ट करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी दारूबंदीच्या प्रश्नावर मौनच बाळगले.
प्रदेश महिला काँग्रेसच्या लोणावळा येथील प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा रेखा जोशी, िपपरीच्या अध्यक्षा ज्योती भारती आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची वेळ सकाळी दहाची होती. प्रत्यक्षात पावणेबाराला कार्यक्रम सुरू झाला. ‘दिव्य मराठी’ चे संपादक कुमार केतकर यांचे ‘काँग्रेस पक्षाचा प्रवास व पक्षापुढील आव्हाने’ या विषयीचे व्याख्यान झाले. त्यानंतर, हर्षवर्धन पाटील यांनी महिलांसाठी काँग्रेसने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. महिला धोरण, सबलीकरण, अन्न सुरक्षा, आधार कार्ड, शिक्षणाचा व माहितीचा अधिकार, शून्य टक्क्य़ाने दिलेले पीक कर्ज, गृहनिर्माण सोसायटय़ांचे नवे धोरण आदींविषयी माहिती देत त्याचा प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री भाषणास उभे राहताच कार्ला सेझच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी एका कार्यकर्त्यांने घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी त्यास बाहेर काढले. महिलांचे प्रश्न सोडवण्याच्या हेतूने हे शिबिर असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी परकीय गुंतवणूक, रस्ते, दूरसंचार, वाहनउद्योग, शेती, दुष्काळ, औद्योगिक प्रकल्प आयात-निर्यात धोरण, भाववाढ, महागाई आदींची माहिती दिली. महिला आरक्षणाविषयी ते म्हणाले, आरक्षणातून मोठी राजकीय शक्ती व महिलांचे नेतृत्व उभे राहात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण मंजूर झाले असून राज्यसभेतही ते विधेयक मंजूर झाले आहे. मात्र, लोकसभेत झाले नाही. कारण संख्याबळाचा मुद्दा आहे. मात्र, सोनिया गांधी यांचा निर्धार असल्याने लोकसभेतही ते मंजूर होईल. िपपरी-चिंचवड हद्दीतील संरक्षण खात्याच्या प्रश्नावर संरक्षणमंत्र्यांशी चर्चा झाली असून पुन्हा चर्चा करू, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमल व्यवहारे यांनी केले. डॉ. स्मिता शहापूरकर यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री शेळके यांनी आभार मानले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 19, 2013 2:53 am