नेत्रचिकित्सेसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘ए/बी स्कॅन’ प्रकारच्या सोनोग्राफी मशिनद्वारे गर्भवती महिलेच्या सोनोग्राफीचे प्रात्यक्षिक पालिकेच्या ‘गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदानविरोधी कक्षा’ने (पीसीपीएनडीटी) केले आहे. विशेष म्हणजे प्रात्यक्षिकात नेत्रचिकित्सेच्या सोनोग्राफी मशिनचा मूळ प्रोब न बदलताच गर्भाची सोनोग्राफी करता आल्याचे पालिकेतील सूत्रांचे म्हणणे आहे.
गोपनीयता पाळून केल्या गेलेल्या या प्रात्यक्षिकाच्या निष्कर्षांबाबत पालिकेने राज्याच्या आरोग्य विभागाला पाठवलेले पत्र ‘लोकसत्ता’च्या हाती आले आहे. या पत्रातील मजकुरानुसार पालिकेने प्रात्यक्षिकात १३ आठवडय़ांच्या गरोदर महिलेची सोनोग्राफी नेत्रचिकित्सेसाठीचे ‘ए/बी स्कॅन’ सोनोग्राफी मशिन वापरुन केल्याचे म्हटले आहे. १३ ते १४ आठवडय़ांच्या गर्भाची हालचाल, हृदयाचे ठोके, गर्भाचा मेंदू, मणका, मूत्रपिंड, मूत्राशय आणि हात-पाय सोनोग्राफीत दिसून आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
नेत्रचिकित्सेसाठी वापरल्या जाणाऱ्या मशिन्सचे ‘ए’ व ‘बी’ स्कॅन असे दोन प्रकार आहेत. याशिवाय आणखी एक ‘यूबीएम’ नावाचा प्रोब देखील नेत्रचिकित्सेसाठी वापरला जातो. नेत्रचिकित्सकांनी त्यांच्याकडील सोनोग्राफी मशिन्सची पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत नोंदणी करावी असे आवाहन पालिकेने २८ सप्टेंबर रोजी केले होते. त्यानुसार ३१ ऑक्टोबपर्यंतची मुदत नोंदणीसाठी देण्यात आली होती. ‘पुणे ऑप्थॅल्मॉलॉजी सोसायटी’ ही संघटना या विरोधात न्यायालयात गेली असून मुंबई उच्च न्यायालयात हा खटला सुरू आहे. पालिकेच्या पीसीपीएनडीटी विभागाच्या प्रमुख डॉ. वैशाली जाधव व सोसायटीचे अध्यक्ष डॉ. माधव भट या दोहोंनीही प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यासंबंधी काहीही बोलण्यास नकार दिला.
एका नेत्रतज्ज्ञांनी सांगितले,‘नेत्रचिकित्सेचे ए-स्कॅन सोनोग्राफी मशिन केवळ डोळ्याची खोली तपासण्यासाठी वापरतात व त्याद्वारे गर्भाची सोनोग्राफी होणे शक्यच नाही. बी स्कॅन मशिनच्या प्रोबची फ्रीक्वेन्सी १५ ते २० मेगाहर्टझ् असून या प्रोबने सोनोग्राफीचे चित्र अधिक स्पष्ट दिसत असले तरी या फ्रीक्वेन्सीला खोलवर जाण्याची क्षमता (पेन्रिटेशन) नसते. डोळ्याची खोली २१ मीमी असून ही प्रोब ३० मीमीपर्यंतचे चित्रण घेऊ शकते. गर्भवती स्त्रीच्या पोटावरील त्वचा, चरबी, स्नायू यांचीच जाडी साधारणत: ३० मीमी (३ सेमी) पर्यंत जाऊ शकेल. पण त्याच्याही आत असलेल्या गर्भापर्यंत प्रोबची क्षमता पोहोचत नाही. परंतु तरीही बी-स्कॅन मशिनबाबत चर्चेस वाव आहे.’ पुण्यातील ९० टक्के नेत्रतज्ज्ञ ए-स्कॅन सोनोग्राफी मशिनचा वापर करत असून १० टक्के जणांकडे बी-स्कॅन मशिन असल्याचेही या नेत्रतज्ज्ञाने सांगितले.