बेमुदत संप पुकारलेल्या साऊंड, लाईट अँड जनरेटर्स असोसिएशनने बालगंधर्व रंगमंदिर येथील ‘संगीत सम्राट’चा खेळ शुक्रवारी बंद पाडला. ऐनवेळी रंगमंदिर प्रशासनाने ध्वनिव्यवस्था पुरविण्याच्या निर्णयाला शासकीय अध्यादेशाची सबब पुढे करीत आडकाठी घेतल्यामुळे निर्मात्याला प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत करावे लागले. दरम्यान, असोसिएशनच्या बंदमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शनिवारी (१२ ऑगस्ट) होणाऱ्या विविध कार्यक्रमांना फटका बसण्याची शक्यता आहे.

साऊंड, लाईट जनरेटर्स ही सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांवर लादलेल्या र्निबधांसंदर्भात ध्वनी संयोजन समिती आणि पोलीस प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे शुक्रवारपासून संप पुकारला आहे. पुढच्या टप्प्यात दहीहंडीच्या दिवसापासून (१५ ऑगस्ट) बेमुदत बंद सुरू करण्यात येणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष उदय शहा यांनी गुरुवारी सांगितले होते. त्याचा फटका बालगंधर्व रंगमंदिर येथील ‘संगीत सम्राट’ कार्यक्रमाला शुक्रवारी बसला. बेमुदत संपावर असलेल्या साऊंड, लाईट अँड जनरेटर असोसिएशनच्या सभासदांनी या कार्यक्रमाला ध्वनिव्यवस्था दिली नाही. त्याचप्रमाणे शासकीय अध्यादेश असल्यामुळे महापालिकेची ध्वनिव्यवस्था पुरविणे शक्य होणार नाही, असे सांगत रंगमंदिर प्रशासनाने ध्वनिव्यवस्था दिली नाही. त्यामुळे कार्यक्रम रद्द करून प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत करण्याखेरीज दुसरा पर्याय उरला नसल्याचे निर्माते सतीश लालबिगे यांनी सांगितले. रंगमंदिराचे भाडे, जाहिरातीचा खर्च, कलाकारांचे मानधन आणि प्रेक्षकांना परत करावे लागलेले पैसे असे ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून त्याची भरपाई मिळावी, अशी मागणी लालबिगे यांनी केली. आम्ही कोणावरही कार्यक्रम बंद करण्याची सक्ती केलेली नाही. असोसिएशनच्या सभासदांनी या कार्यक्रमाच्या ध्वनिव्यवस्थेचे काम करणाऱ्या सहकाऱ्याला विनंती केली, असा दावा असोसिएशनचे सचिन नाईक यांनी केला. ज्या कलाकारांबरोबर आम्ही काम करतो त्यांनाच कसे अडचणीत आणू शकतो, असा सवालही नाईक यांनी केला. महापालिकेच्या रंगमंदिराची ध्वनियंत्रणा ही नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सभा यांच्यासाठी चांगली आहे. मात्र, लावणी आणि ऑर्केस्ट्रा या कार्यक्रमांना मोठा आवाज असलेल्या स्वतंत्र ध्वनियंत्रणेची गरज असते. त्यामुळे महापालिकेची यंत्रणा वापरली जात नाही, अशी माहिती लावणी निर्माते शशिकांत कोठावळे यांनी दिली. तर, लावणी आणि ऑर्केस्ट्रा या कार्यक्रमांचे निर्माते महापालिकेची यंत्रणा वापरत नसल्यामुळेच बहुधा त्यांना ध्वनिव्यवस्था पुरविली गेली नसावी. मात्र, यासंदर्भात शासकीय अध्यादेश काय आहे, यासंदर्भात माहिती घेतल्याशिवाय नेमकेपणाने सांगता येणार नाही, असे रंगमंदिर व्यवस्थापक प्रकाश अमराळे यांनी सांगितले.

ध्वजारोहणाला सेवा देणार

साऊंड, लाईट जनरेटर्स असोसिएशनने संप पुकारला असला तरी आम्ही मंगळवारी (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमांसाठी ध्वनियंत्रणा पुरविण्याची सेवा देणार आहोत. मात्र, स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना असोसिएशनचे सभासद कोणत्याही स्वरूपाची सेवा देणार नाहीत, असे संघटनेचे अध्यक्ष उदय शहा यांनी सांगितले. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने ध्वनियंत्रणेवर ५५ डेसिबल आवाजाची मर्यादा घातली आहे. मात्र, हा आवाज कसा मोजावा याबाबत शंका आहे. एकाच परिसरात विविध ठिकाणांवरून मोजल्या जाणाऱ्या डेसिबलमध्ये तफावत असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. विविध कार्यक्रमात आयोजकांच्या सांगण्यावरून आवाज वाढविल्यास ध्वनियंत्रणा पुरविणाऱ्या संस्थेवर केल्या जाणाऱ्या कारवाया रोखाव्यात. ध्वनिवर्धकांच्या संख्येवरूनही संदिग्धता आहे. एकीकडे डॉल्बी साऊंड सिस्टीमवर र्निबध लादले जात असताना पाच हजार ढोल वाजवले जातात, हा न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान नाही का, असा सवालही शहा यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांना विघ्न?

पुणे महापालिकेतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी (१२ ऑगस्ट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारवाडा पटांगणावर होणार आहे. त्याचप्रमाणे एमआयटी संस्थेच्या डॉ. विश्वनाथ कराड विश्वशांती विद्यापीठाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. साऊंड, लाईट जनरेटर्स असोसिएशनने पुकारलेल्या संपामुळे या कार्यक्रमांना विघ्न आले आहे. आमच्या सभासदाने एमआयटी येथे लावलेली ध्वनियंत्रणा काढून घेतली असल्याची माहिती असोसिएशनचे सचिन नाईक यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या शनिवारवाडा येथील कार्यक्रमासाठी पर्यायी ध्वनिव्यवस्था आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.