म्हात्रे पुलाजवळील रस्त्यावर लग्नाची वरात काढण्यावर राष्ट्रीय हरित लवादाने घातलेल्या बंदीच्या पाश्र्वभूमीवर गणेशोत्सव आणि त्याच्या सरावाच्या नावाखाली होणाऱ्या दणदणाटाचे काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. गणेशोत्सवाला अजून दोन महिन्यांचा अवधी असला, तरी पथकांचा सराव सुरू असल्याने या दणदणाटाने सराव होत असलेल्या ठिकाणाच्या परिसरातील नागरिक हैरण झाले आहेत.
म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावर बहुतांश लॉन्स आहेत. या ठिकाणी होणाऱ्या विवाह समारंभाच्या निमित्ताने मिरवणुका निघतात. बँडपथक आणि ढोल-ताशा पथकांच्या आवाजामध्ये निघणाऱ्या या मिरवणुका, फटाक्यांची आतषबाजी यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण त्याचप्रमाणे वाहतुकीची कोंडी याबाबत या परिसरातील रहिवाशांनी पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यावर निकाल देताना राष्ट्रीय हरित लवादाने लग्नाच्या मिरवणुका काढण्यावर बंदी घातली होती. त्या पाश्र्वभूमीवर या भागात सराव करणाऱ्या ढोल-ताशा पथकांच्या नियमित वादनाचे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.
डीपी रस्ता परिसरामध्ये किमान २० ते २५ ढोल-ताशा पथकांचा सराव चालतो. या सरावामध्ये एका वेळी ३० ते ५० ढोलांचे वादन केले जाते. या आवाजामुळे मोठय़ा प्रमाणावर ध्वनिप्रदूषण होते. काही पथके परवान्याविना सराव करीत असल्याचे गेल्या वर्षी आढळून आले होते, अशी माहिती या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी दिली. गणेशोत्सवाला अजून दोन महिने असले तरी काही ढोल-ताशा पथकांचा सराव आतापासूनच सुरू झाला आहे. त्यामुळे यंदा ढोल-ताशा पथकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस कोणती भूमिका घेतात याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
‘लोकांचा गोंगाटाला विरोध’
‘‘ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियम २००० त्याचप्रमाणे न्यायालयाच्या निकालानुसार त्या भागात ध्वनिप्रदूषणाची पातळी ही ५५ डेसिबल्सपक्षा अधिक असता कामा नये, असे नमूद केले आहे. असे असतानाही नदीपात्रातील रस्त्यात काही ठिकाणी सामाजिक स्वीकृतीतून ढोल-ताशा पथकांचा सराव सुरू आहे. पोलीस किंवा महापालिका परवानगी देऊ शकत नाहीत. काही ठिकाणी नागरिक जागृत झाले असून या दणदणाटाविरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार अर्ज दाखल केले आहेत. लोकांचा गणेशोत्सवाला विरोध नाही. पण, गोंगाटाला विरोध असून लोक धीटपणाने बोलू लागले आहेत.’’
– अॅड. असीम सरोदे
महासंघाच्या आवाहनाला यश
यंदा गणेशोत्सव उशिरा असल्याने ढोल-ताशा पथकांनी १ ऑगस्टपासून सराव सुरू करावा, या ढोल-ताशा महासंघाने केलेल्या आवाहनाला बऱ्यापैकी यश मिळाले आहे. त्यामुळे दोनशे पथकांतील काही मोजक्याच पथकांनी सराव सुरू केला आहे. पाऊस सुरू झाल्यावर नदीपात्रातील सरावाला बंधने येतात. सरावाला किती वेळ मिळेल याविषयी साशंकता असल्याने काही पथकांनी आता सराव सुरू केला आहे. पोलीस परवानगी देणार नसले, तरी वाद्यांची संख्या मर्यादित ठेवण्याबरोबरच काही ठरावीक वेळेमध्येच सराव करण्याचे बंधन स्वीकारण्याचा मार्ग काढण्याचे परस्पर सामंजस्यातून प्रयत्न सुरू आहेत.
– पराग ठाकूर, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष