शहरातील आवाजाच्या फटाक्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून कमी झाले असले, तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत दिवाळीच्या दिवसांत ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण कमी झालेले नाही. किंबहुना शहरातील अनेक भागांमध्ये यावर्षी फटाक्यांचा आवाज वाढलेला असल्याचेच महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अहवालावरून दिसत आहे.
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून दिवाळीतील लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या तीन दिवशी शहरातील चौदा भागांमधील आवाजाच्या पातळीची पाहणी करण्यात आली. गेल्या काही वर्षांत फटाक्यांचे प्रमाण कमी झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात येत असले, तरीही फटाक्यांचा आवाज कमी झालेलाच नाही. रहिवासी भागांत दिवसा ५० डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल असा ध्वनीच्या मर्यादेचा निकष आहे. मात्र, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (११ नोव्हेंबर) शहरातील आवाजाची पातळी ही साधारण ८५ डेसिबलपर्यंत होती. साधारणपणे पाडवा आणि भाऊबीजेच्या दिवशी आवाजाची पातळी कमी होते. मात्र, यावर्षी पाडव्याच्या दिवशीही (१२ नोव्हेंबर) आवाजाची पातळी ८० ते ८५ डेसिबलपर्यंत होती. भाऊबीजेच्या दिवशी (१३ नोव्हेंबर) साधारण सरासरी पातळी ही ७५ डेसिबल असल्याचे दिसत आहे. नियमाला हरताळ फासून रात्री दहानंतरही फटाक्यांचे आवाज घुमल्याचे दिसत आहे. रात्री दहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत शहरातील आवाजाची पातळी ही ६५ ते ७० डेसिबलपर्यंत असल्याचे दिसत आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत अनेक भागांत यावर्षी आवाज वाढलेलाच दिसला. दिवाळीच्या तिनही दिवशी पहाटे ६ ते रात्री १० वाजेपर्यंत कर्वेरस्ता परिसरातील नागरिकांना कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाला सामोरे जावे लागल्याचे दिसत आहे. हे तीनही दिवस आवाजाची सर्वाधिक नोंद या भागांत झाली. या भागांत लक्ष्मीपुजनाच्या दिवशी ९२.७ डेसिबल, पाडव्याच्या दिवशी ९०.२ डेसिबल आणि भाऊबीजेच्या दिवशी ७५.८ डेसिबल इतकी नोंद झाली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या भागांतील आवाजाची पातळी १०१.९ डेसिबलपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत या भागांतील आवाज १५ ते १८ डेसिबलने वाढल्याचेच दिसत आहे. एखादा अपवाद वगळता शहरातील सर्वच भागांत तिन्ही दिवस ५ ते १० डेसिबलपर्यंत आवाजात वाढ झाल्याचेच दिसत आहे. शहरातील शांतता क्षेत्रांमध्येही फटाक्यांचा आवाज यावर्षी मोठाच होता.

शहरातील विविध भागांतील आवाजाची सरासरी पातळी (डेसिबलमध्ये)
        
        लक्ष्मीपूजन    पाडवा    भाऊबीज

शिवाजीनगर        ७२.३    ७४.१    ७२.८
कर्वेरस्ता        ९२.७    ९०.२    ७५.८
सातारा रस्ता        ७०.३    ७३.७    ७३.२
स्वारगेट        ८२.९    ७५.९    ७७.९
येरवडा            ७१.९    ६४.१    ७२.८
खडकी            ७२.९    ८०.५    ७६.५
कोथरूड        ८१.५    ९०.६    ७०.७
शनिवारवाडा    ८५.३    ८२.७    ८१.७
लक्ष्मी रस्ता        ८०.५    ८१.८    ८०.६
मंडई             ८४.२     ८४.१    ८२
सारसबाग        ७९.३    ७०.९    ७६.८
कोरेगाव पार्क    ८३.५    ७२.८    ८०.७
औंध            ८०.२    ८१.४    ७६.३
विश्रांतवाडी        ७८.७    ७५.९    ७४.९
विद्यापीठ रस्ता    ७६.३    ७६.६    ७२.८