पुणे :  नैर्ऋत्य मोसमी पाऊस यंदा नियोजित वेळीच भारतात दाखल होणार आहे. १ जूनला त्याचे केरळमध्ये आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून गुरुवारी वर्तविण्यात आला.

गेल्या वर्षी १७ मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी धडक दिली होती. त्यानंतर नियोजित वेळेला म्हणजे १ जूनला मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला होता. यंदाही तशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात ११ जूनला मोसमी वारे दाखल झाले होते. यंदाही याच दरम्यान म्हणजे १० जूनपर्यंत तळकोकणातून मोसमी वारे दाखल होतील आणि पुढील दहा दिवसांत ते राज्यव्यापी होतील, असा अंदाज आहे.