सीबीएसई, आयसीएसई मंडळांच्या निकालात ८०-९० टक्क्य़ांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी जागा वाढूनही विद्यार्थ्यांमध्ये चुरस होण्याची शक्यता आहे. यंदा सीबीएसई, आयसीएसई मंडळांच्या निकालात ८०-९० टक्क्य़ांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दुपटीने वाढल्याने नामांकित महाविद्यालयांतील कटऑफ गुणांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

यंदा सीबीएसई, आयसीएसईच्या निकालात विशेष फरक पडलेला नाही. मात्र, ८०-९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दुपटीहून वाढली आहे. सीबीएसई आणि आयसीएसईच्या राष्ट्रीय पातळीवरील निकालात ९५ टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अनुक्रमे ५७ हजार आणि सुमारे २१ हजारांवर गेली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सीबीएसई आणि आयसीएसईशी संलग्न शाळांची संख्या बरीच असल्याने या शाळांतील विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशांसाठीच्या स्पर्धेत दाखल होतात.त्यामुळे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी स्पर्धा करावी लागते. स्वाभाविकच विद्यार्थ्यांचे प्राधान्य असलेल्या नामांकित महाविद्यालयांतील कटऑफ गुण वाढण्याची शक्यता आहे.

खुल्या जागांमध्ये घट

यंदा अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी १६ टक्के व आर्थिकदृटय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी १० टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे खुल्या गटासाठी उपलब्ध जागांमध्ये घट होणार आहे. मराठा व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांसाठीच्या आरक्षणामुळे अकरावीला १०३ टक्कय़ांपर्यंत आरक्षण होत होते. हे गणित जमवून आणण्यासाठी संस्थेला त्यांच्याकडील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठीच्या राखीव कोटय़ात कपात करण्यात आली आहे. ज्या संस्थांचे त्यांच्या परिसरात कनिष्ठ महाविद्यालय असते अशा संस्थेतील विद्यार्थी त्याच संस्थेत प्रवेश घेण्यासाठी प्राधान्य देतात. साधारण ६० ते ८० टक्कय़ांमधील विद्यार्थी हे संस्थेतील हक्काच्या राखीव जागांवर प्रवेश घेतात. या विद्यार्थ्यांसाठी यंदा २० टक्क्य़ाऐवजी १० टक्के जागा राखीव असतील.

अकरावीच्या प्रवेश अर्जाचा भाग १ भरण्यास सुरुवात

शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेशांबाबत पालक आणि विद्यार्थ्यांसाठी २२ आणि २३ मे रोजी उद्बोधन वर्गाचे आयोजन केले होते. आता अकरावीच्या प्रवेशांसाठी दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका त्यांच्या शाळेत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. माहिती पुस्तिकेत लॉगिन आणि पासवर्ड देण्यात आला असून, त्या द्वारे ऑनलाइन अर्जाचा भाग १ भरण्यास सोमवारी (२७ मे) ११ वाजल्यापासून सुरुवात होणार असल्याची माहिती प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी दिली.

यंदा अकरावीच्या जागांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुबलक जागा उपलब्ध असतील. गेली काही वर्षे अकरावीच्या जागा रिक्त राहात आहेत. त्यामुळे एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही.

– मीनाक्षी राऊत, प्रभारी उपसंचालक