श्रमिक गाडय़ा वगळता १ जूनपासून रेल्वेकडून काही विशेष गाडय़ा सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात पुण्याला एक गाडी देण्यात आली आहे. दानापूर (पटना) येथे ही गाडी सोडण्यात येणार असून, पुण्यातून बिहारकडे जाण्यासाठी सर्वाधिक मागणी असल्याचेही त्या निमित्ताने पुन्हा स्पष्ट झाले आहे. सध्या सोडण्यात येणाऱ्या  ७७ श्रमिक गाडय़ांच्या माध्यमातून १ लाखाहून अधिक मजूर, कामगारांना रवाना केले आहेत.

परराज्यातील मजूर आणि कामगारांची मागणी लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्णयानुसार आणि राज्य शासनाच्या नियोजनाप्रमाणे सध्या राज्यातील अनेक स्थानकांवरून श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहेत. या आठवडय़ामध्ये या गाडय़ांची संख्या वाढविण्यात आली आहे.

एकटय़ा पुणे विभागातून दररोज पाच ते सहा श्रमिक गाडय़ा सोडण्यात येत आहेत. या गाडय़ांबरोबरच १ जूनपासून देशातील विविध स्थानकांवरून विशेष गाडय़ा सोडण्याचे नियोजन रेल्वेकडून करण्यात आले आहे. त्यात मुंबईतून सर्वाधिक गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.