‘स्मार्ट सिटी’तून पिंपरी-चिंचवडला वगळण्यात आल्याच्या मुद्दय़ावरून शहरातील राजकारण तापलेले असतानाच सोमवारी त्याच विषयावर आयोजित विशेष सभेत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. सत्ताधाऱ्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. पालिकेतील भ्रष्ट कारभारामुळेच ही वेळ आल्याने आत्मपरिक्षण करावे, या टीकेला उत्तर देताना शहराला वगळण्याचा कट भाजपचाच आहे, असा प्रत्यारोप सत्ताधाऱ्यांनी केला.
महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखालील सभेत मंगला कदम, अतुल शितोळे, सुलभा उबाळे, आर. एस. कुमार, शमीम पठाण, झामाबाई बारणे, अपर्णा डोके, भारती फरांदे, अजित गव्हाणे, प्रशांत शितोळे, बाबासाहेब धुमाळ, नारायण बहिरवाडे, सीमा सावळे, आशा शेंडगे, अॅड. गोरक्ष लोखंडे, सुरेश म्हेत्रे, धनंजय आल्हाट, किरण मोटे, तानाजी खाडे, अनंत कोऱ्हाळे आदींनी ‘स्मार्ट सिटी’संदर्भात मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादीच्या बहुतांश नगरसेवकांनी सभेकडे पाठ फिरवली. शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये शाब्दीक चकमक झाली. पिंपरीचा ‘स्मार्ट सिटी’त समावेश झालाच पाहिजे. शहर मुळातच स्मार्ट आहे, यापूर्वीही भरपूर विकासकामे झाली आहेत. शहरांच्या स्पर्धेत आपण पहिल्या पाचमध्ये होतो. मुख्यमंत्री देखील ग्वाही देत होते. मग असे काय घडले, की आपल्याला डावलण्यात आले. भाजपने राजकारण केले. सुरूवातीला पिंपरीचा समावेश झाला, तेव्हा श्रेयासाठी ते आघाडीवर होते आणि जेव्हा पत्ता कापण्यात आला, त्यानंतर, ते पालिकेतील भ्रष्ट कारभाराच्या नावाने गळा काढू लागले, हा त्यांचा दुट्टपीपणा आहे, असा सदस्यांचा सूर होता.
दरम्यान, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या माजी महापौरांच्या बैठकीतही ‘स्मार्ट सिटी’चे पडसाद उमटले. ‘स्मार्ट सिटी’साठी राजकीय मतभेद होऊ न देता एकमेकांशी समन्वय ठेवून प्रयत्न झाले पाहिजे, अशी अपेक्षा माजी महापौरांनी बैठकीत व्यक्त केली.

‘स्मार्ट सिटी’साठी दोन शिष्टमंडळे?
केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीचे महापौर, आयुक्तांचे शिष्टमंडळ जाणार आहे. तथापि, शहर भाजपाकडून नायडू यांची स्वतंत्र भेट घेण्याची हालचाल सुरू आहे. त्यामुळे एकाच विषयासाठी एकाच मंत्र्याकडे दोन शिष्टमंडळे जाणार का, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.