शहरात उभारण्यात आलेली हजारो अनधिकृत होर्डिग तसेच अनधिकृत मोबाईल टॉवर यासंबंधीची खरी आकडेवारी महापालिका केव्हा देणार आणि किती वर्षे या प्रश्नावर आम्ही भांडायचे ते तरी सांगा, अशी विचारणा नगरसेवक अविनाश बागवे यांनी केल्यानंतर अखेर या विषयांवर खास सभा बोलावण्याचा निर्णय मुख्य सभेत घेण्यात आला.
शहरातील हजारो होर्डिग आणि मोबाईल टॉवर अनधिकृत असून त्यामुळे महापालिकेचा कोटय़वधी रुपयांचा महसूल बुडत आहे. मात्र, ही माहिती वारंवार देऊनही प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही, असा मुद्दा बागवे यांनी सभेत उपस्थित केला होता. यासंबंधी प्रशासनाने दिलेला अहवालही चुकीची माहिती देणारा असून त्यातील आकडेवारीत तथ्य नसल्याचेही बागवे यांनी सभेच्या निदर्शनास आणून दिले. भाजपचे गटनेता अशोक येनपुरे, श्रीनाथ भिमाले, शिवलाल भोसले, मुक्ता टिळक, सुनंदा गडाळे यांनीही या विषयावरील चर्चेसाठी खास सभेची मागणी केली.
या प्रश्नावर पक्षनेत्यांची समिती स्थापन करण्याची सूचना सभेत करण्यात आली. मात्र, या सूचनेला हरकत घेत जी काय चर्चा करायची आहे ती सभागृहात सर्वासमोर झाली पाहिजे आणि होर्डिग व मोबाईट टॉवरचा अहवालही सर्व सदस्यांना मिळाला पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अखेर बागवे यांनी केलेल्या आग्रही मागणीला यश आले आणि फक्त पक्षनेत्यांशी चर्चा न करता वा त्यांची बैठक न घेता या विषयावरील चर्चेसाठी खास सभा बोलावली जाईल, असे जाहीर करण्यात आले.