चित्र दाखवून त्याचा अर्थ ध्वनित करणारे उपकरण, आयपॅडवर खेळले जाणारे गेम्स, कॉलर माईक अशा उपकरणांचा वापर करून ‘ऑटिझम’ म्हणजे स्वमग्नतेवर उपचार करण्यास सुरुवात झाली असून स्वत:च्या भावना व्यक्त करण्यात अडचणी येत असलेल्या स्वमग्न मुलांना या आधुनिक उपचारांचा फायदा होत आहे.
मंगळवारी (२ एप्रिल) जागतिक ऑटिझम दिनानिमित्त ‘प्रसन्न ऑटिझम सेंटर’ या संस्थेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक साधना गोडबोले यांनी ही माहिती दिली.
स्वमग्नता हा आजार नसून ती मेंदूच्या विकासाशी संबंधित अवस्था आहे. स्वमग्न बालकांना स्वत:ला काय हवे आहे ते सांगणे, भावना व्यक्त करणे अशा रोजच्या जीवनातील गोष्टी करताना अडचणी येतात. गोडबोले म्हणाल्या, ‘‘या बालकांना एखादी गोष्ट समजावून सांगायची असल्यास ती शब्दांनी न सांगता चित्रांनी सांगितल्यास त्यांच्या ती लवकर लक्षात येते. चित्र दाखवून त्याचा अर्थ ‘बोलून’ दाखविणारे आवाज यंत्र वापरून किंवा चित्रांची कार्डे दाखवून हे साधता येते. स्वमग्न बालकांपैकी पन्नास टक्के बालके स्वरयंत्राचा वापर करू शकत नसल्याने बोलू शकत नाहीत. त्यांना या उपचारांचा विशेष फायदा होतो. आयपॅडवरील गेम्स या बालकांची एकाग्रता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. अशा उपकरणांद्वारे करण्यात येणारे स्वमग्नतेवरील उपचार देशात गेल्या दीड-दोन वर्षांपासून वापरण्यात येत आहेत.’’
या निमित्ताने युनायटेड किंग्डम येथून आलेल्या स्वमग्नताविषयक प्रशिक्षक कॅथी मॉरिस्रो आणि जेनी फ्लीटवूड यांनी स्वमग्म मुलांच्या पालकांना मार्गदर्शन केले.
सध्या संस्थेत ३ ते १३ आणि १४ ते १७ अशा दोन वयोगटांतील एकूण ४८ स्वमग्न बालके आहेत. मोठय़ा वयोगटाच्या बालकांना स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने विशिष्ट प्रशिक्षणही संस्थेतर्फे दिले जाते.