होळीसाठी प्रवाशांची मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या वतीने पुणे- गोरखपूर या मार्गावर विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. या गाडीच्या चार फेऱ्या होणार असून, ७ मार्चपासून या गाडीचे आरक्षण सुरू करण्यात येणार आहे.
पुणे- गोरखपूर ही गाडी १५ व २२ मार्चला सकाळी पावणेअकरा वाजता पुणे स्थानकाहून सुटेल. दुसऱ्या दिवशी रात्री पावणेआठ वाजता ही गाडी गोरखपूर येथे पोहोचेल. गोरखपूर- पुणे ही गाडी १३ व २० मार्चला दुपारी तीन वाजता गोरखपूर स्थानकावरून सोडण्यात येईल. तिसऱ्या दिवशी पहाटे पावणेतीन वाजता ही गाडी पुणे स्थानकात दाखल होईल.
दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, हबीबगंज, भोपाळ, बिना, ललितपूर, झाँसी, कानपूर, लखनौ, बाराभांकी, गोंडा, मनकापूर, बस्ती व खलीलाबाद या स्थानकावर या गाडीला थांबा देण्यात आला आहे. एसी टू व थ्री टियरचा प्रत्येकी एक डबा, आठ स्लीपर कोच, सहा जनरल क्लासचे व सेकंड क्लासचे दोन डबे या गाडीला असतील.