पिंपरीत विशेष मतदार नोंदणी मोहीम, ५०० मंडळांना सीडींचे वाटप
पिंपरी महापालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विशेष मतदार जनजागृती मोहिमेसाठी ‘सैराट’फेम आर्चीच्या नावाचा वापर करण्यात आला आहे.
‘मी आर्ची बोलतेय’, असे सांगत सीडीतील निवेदनाची सुरुवात होत असली तरी प्रत्यक्षात तो आर्चीचा आवाज नाही. तरीही याप्रकारे आवाहन केल्यास चांगला प्रतिसाद मिळेल, असे गृहीत धरून पिंपरी पालिकेने जवळपास ५०० मंडळांना अशा सीडींचे वाटप केले आहे.
एक जानेवारी २०१७ रोजी ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण होत आहे, अशा युवकांसाठी पिंपरी पालिकेने विशेष मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन केले आहे. जवळपास एक महिना ही मोहीम चालणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेने ही साडेचार मिनिटांची सीडी तयार केली आहे.
आर्ची तरुणांना लवकरात लवकर मतदार नोंदणी करण्याचे आवाहन करते आहे, तसेच मतदारांचे हस्तांतर, नावे व पत्त्यामधील बदल आणि नोंदणीची ठिकाणे आदींची माहिती सीडीतून दिली जात आहे. गणेशोत्सवात देखावे सादर करणाऱ्या मंडळांना या सीडीद्वारे जनजागृती करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. त्यासाठी जवळपास ५०० मंडळांना सीडींचे वाटप करण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 15, 2016 2:11 am