वेगमर्यादा आता ८० किमीवरून ६० किमी प्रतितास; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलिसांकडून उपाययोजना

पुणे : मुंबई-बंगळुरु बाह्य़वळण मार्गावर गंभीर अपघातांचे सत्र सुरू असतानाच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलिसांकडून वेगमर्यादेला वेसण घालण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुंताश अपघात भरधाव वेगामुळे झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. बाह्य़वळण मार्गावर कात्रज येथील नवीन कात्रज बोगदा ते वारजे भागातील मुठा नदीवरील पुलापर्यंत नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले आहे. या भागात वेगमर्यादा ८० किलोमीटर प्रतितासावरून ६० किलोमीटर प्रतितास अशी करण्यात आली आहे.

या भागात भरधाव वाहनांचा वेग कमी करण्यासाठी गतिरोधक (रम्बलर स्ट्रीप), अपघात प्रवण क्षेत्रांची माहिती देणारे फलक बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत. मुंबई-बंगळुरु बाह्य़वळण मार्गावर गेल्या महिन्यात गंभीर स्वरूपाचे सहा अपघात घडले. खेडशिवापूर ओलांडल्यानंतर नवीन कात्रज बोगदामार्गे पुणे तसेच मुंबईकडे जाणारी अवजड वाहने भरधाव जातात. दरी पूल ओलांडल्यानंतर सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे परिसरापर्यंत तीव्र उतार आहे. तीव्र उतारावर वाहनांचे ब्रेक निकामी होऊन गंभीर स्वरूपाचे अपघात घडत आहेत. या भागात उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच पोलिसांकडून नुकतीच पाहणी करण्यात आली.

त्यानुसार सर्वेक्षणात वेगमर्यादेला वेसण घालण्यासाठी या भागातील वाहनांचा वेग कमी करण्यासाठी वेगमर्यादा ६० किमी प्रतितास अशी करण्यात आली आहे.

बाह्य़वळण मार्गावर पाहणी करून ठिकठिकाणी रम्बलर स्ट्रीप बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनांचे वेग कमी होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बाह्य़वळण मार्गावरील  अपघात

वर्ष           अपघात   मृत्यू   गंभीर    अपघात   जखमी

२०१९          १५          १६        १०             १२

२०२०          १४          १८        १५             २१

(आकडेवारी नोव्हेंबर अखेरीपर्यंतची)

बावळण मार्गावर वारजे पूल ते मुठा नदीपर्यंत वाहनांच्या वेगाला वेसण घालण्यासाठी वेगमर्यादा ८० किमी प्रतितासवरून ६० किमी प्रतितास करण्यात आली आहे. अपघात रोखण्यासाठी या मार्गावर भरधाव वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे.

– देविदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड पोलीस ठाणे</strong>

मुंबई-बंगळुरु बाह्य़वळण मार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांनी काही उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यानुसार या मार्गावर उपाययोजना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

– सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)