गेल्या सहा महिन्यांत केवळ १७२ नागरिक रस्त्यावर थुंकले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे कोथरूड, टिळक रस्ता, हडपसर आणि बिबवेवाडीसह शहराच्या अनेक भागांत सहा महिन्यांपासून एकही व्यक्ती रस्त्यावर थुंकलेली नाही!.. या माहितीने फार हरखून जाऊ नका. शहराचे चित्र आता अगदीच पालटून जाणार असेही वाटून घेऊ नका.. कारण ही महापालिकेची आकडेवारी आहे. गेल्या सहा महिन्यांत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या केवळ १७२ नागरिकांवरच पालिका दंडात्मक कारवाई करू शकली आहे.. त्यामुळे रस्त्यावरून जाताना कुठेही पिचकारी टाकणाऱ्या आणि रस्त्यांसह इमारतींचे जिने, भिंती ‘रंगवणाऱ्या’ बहाद्दरांना आवरणे महापालिकेच्याच नव्हे तर कुणाच्याच हातात नसल्याचेच यावरून स्पष्ट झाले आहे.
पालिकेचे सह आयुक्त आणि घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार जुलै ते डिसेंबर २०१३ या कालावधीत औंध, नगर रस्ता, सहकारनगर, विश्रामबाग वाडा, भवानी पेठ आणि धनकवडीत पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी केलेल्या कारवाईत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांकडून एकूण २१,७७२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याअंतर्गत औंधमध्ये सर्वाधिक म्हणजे ९५ नागरिकांवर कारवाई झाली असून त्या खालोखाल विश्रामबाग वाडा येथे २७ जणांवर कारवाई झाली आहे. तर घोले रस्ता, कोथरूड, वारजे-कर्वेनगर, ढोले-पाटील रस्ता, संगमवाडी, टिळक रस्ता, हडपसर, बिबवेवाडी, कोंढवा-वानवडी या भागात रस्त्यावर थुंकणाऱ्या एकाही नागरिकावर कारवाई होऊ शकलेली नाही.
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याबद्दल पालिकेचे आरोग्य निरीक्षक आणि बहुउद्देशीय पथकाच्या कर्मचाऱ्यांमार्फत कारवाई केली जाते. कारवाई झालेल्या भागांमध्ये सरासरी ५० रुपयांपासून १८७ रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात आला आहे. रस्त्यावर थुंकणारा नागरिक दंड भरू शकत नसल्यास त्याने खराब केलेला रस्ता पाण्याने साफ करावा अशीही तरतूद आहे.
रस्त्यावर लघुशंका.. कारवाई अशक्यच
रस्त्यावर लघवी करून रस्ता खराब करणाऱ्यांवर कारवाई करणेही पालिकेच्या हातात नसल्याचीच स्थिती आहे. गेल्या सहा महिन्यांत रस्त्यावर लघवी करणाऱ्या केवळ १५५ नागरिकांवर कारवाई करणे शक्य झाले असून या कारवाईत २१,३२५ रुपयांचा दंड वसूल झाल्याची माहिती सुरेश जगताप यांनी दिली. यात वारजे-कर्वेनगर, ढोले-पाटील रस्ता, संगमवाडी, टिळक रस्ता, हडपसर आणि बिबवेवाडीत एकाही नागरिकावर कारवाई झालेली नाही.
जगताप म्हणाले, ‘‘रस्त्यावर थुंकण्यावर पालिकेतर्फे आठवडय़ातील एक दिवस कारवाई केली जाते. पानटपऱ्यांच्या आसपास मोठय़ा प्रमाणावर थुंकलेले दिसून येत असे. पण पालिकेने तिथे पिकदाणी ठेवण्याचे निर्देश दिल्यामुळे याचे प्रमाण कमी झाले आहे. गुटखा, मावा व सुपारीवरील बंदीमुळेही फायदा होऊ लागला आहे. चौकात थांबून किंवा इमारतींच्या जिन्यांमध्ये थुंकण्याची समस्या अजूनही आहे. इमारतींमध्ये बेसिन बसवून थुंकण्याचे प्रमाण कमी करता येईल. पालिकेच्या इमारतींमध्येही थुंकण्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच शहरात अनेक ठिकाणी पालिकेने नागरिकांना थुंकलेले साफ करायलाही लावलेले आहे.’’