स्थानिक संस्था कराला विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लाक्षणिक बंदला शुक्रवारी बाजारपेठांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लक्ष्मी रस्त्यासह गणेश, नाना, भवानी, रविवार, बुधवार आदी सर्व पेठांमधील तसेच अन्य भागातील बाजार शुक्रवारी बंद राहिले.
स्थानिक संस्था कराला (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) पुणे व्यापारी महासंघाने विरोध केला असून व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी पुण्यात लाक्षणिक बंद पुकारण्यात आला होता. या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया यांनी केला. एलबीटी या करामध्ये अनेक जाचक अटींचा समावेश असून करामधील अव्यवहार्य तरतुदींमुळे व्यापारी वर्गात असंतोष आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी बंद पुकारण्यात आला होता, असे संघटनेचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले. दरम्यान, महासंघाच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त महेश पाठक यांची दुपारी भेट घेऊन त्यांच्याकडे म्हणणे सादर केले. एलबीटीबाबत यावेळी ओस्तवाल, पितळीया यांच्यासह उपस्थितांनी अनेक आक्षेप नोंदवले. काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, तसेच महासंघाचे सूर्यकांत पाठक, फत्तेचंद रांका, विजय जैन, अजित सांगळे, दिलीप नारंग, जयू ठाकूर, वीरेंद्र किराड आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, एलबीटीसाठी जी नोंदणी महापालिकेकडे करायची आहे या नोंदणीसाठी छापील अर्ज वाटपाची तसेच ते स्वीकारण्याची व्यवस्था महापालिकेतर्फे सर्व पंधरा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आणि मुख्य भवनात करण्यात आली आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावरही ही माहिती देण्यात आली आहे.