20 February 2019

News Flash

क्रीडा विषयातही लवकरच पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम

नव्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यापीठांना हे अभ्यासक्रम सुरू करता येणार आहेत.

एकीकडे शालेय स्तरावरील शरीरिक शिक्षण आणि क्रीडा विषयाचे महत्त्व कमी झाल्याचे दिसत असताना उच्च शिक्षणात मात्र खेळांनाही शैक्षणिकदृष्टय़ा महत्त्व मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने शारीरिक शिक्षण आणि क्रीडा या विषयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. नव्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यापीठांना हे अभ्यासक्रम सुरू करता येणार आहेत.

देशात शारीरिक शिक्षणाच्या अध्यापनासाठी राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण परिषदेकडून (एनसीटीई) पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सध्या आहेत. मात्र, हे अभ्यासक्रम शारीरिक शिक्षण विषयाचे अध्यापन करू इच्छिणाऱ्यांसाठी आहेत. मात्र विविध क्रीडा संस्थांचे, प्रशिक्षण संस्थांचे संचालक, क्रीडा मंडळांचे व्यवस्थापन, संघांचे व्यवस्थापन या क्षेत्रातही मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असते. क्रीडा क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची कमी भरून काढण्यासाठी आयोगाने नव्या अभ्यासक्रमांची रचना केली आहे.

‘बॅचलर इन फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स’ (बीपीईएस) ही तीन वर्षे कालावधीचा पदवी अभ्यासक्रम आणि ‘मास्टर्स इन फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स’ (एमपीईएस) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम आता सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी आयोगाच्या ऑक्टोबर २०१५ मध्ये झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. विद्यापीठांना हे अभ्यासक्रम सुरू करून खेळांचा प्रसार करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. या शैक्षणिक वर्षांपासून हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येऊ शकतात. यापूर्वी काही विद्यापीठांमध्ये शारीरिक शिक्षणातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवण्यात येत होते. त्या विद्यापीठांनाही आता अभ्यासक्रमाचे स्वरूप बदलण्याची सूचना आयोगाने केली आहे.

First Published on May 10, 2016 12:33 am

Web Title: sport degree in higher education
टॅग Higher Education